महाराष्ट्रात गटबाजी कराल तर खैर नाही; काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी दिला खणखणीत इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:30 AM2024-06-27T06:30:06+5:302024-06-27T06:30:16+5:30
विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी दिल्लीमध्ये बैठक पार पडली.
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची गटबाजी नको, असा आदेश त्या पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातीलकाँग्रेस नेत्यांना दिला आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांपैकी जे लोक पक्षाचा आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करा. विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी दिल्लीमध्ये बैठक पार पडली. त्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी तसेच महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीत खरगे यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमधील गटबाजी संपली पाहिजे. त्यावर महाराष्ट्रातील या पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, आमच्यात कोणतीही गटबाजी नाही. त्यावर खरगे म्हणाले की, मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांना पदावरून हटवा आणि हटवू नका या मागणीसाठी दोन शिष्टमंडळे माझ्याकडे आली होती.
‘राज्यातील नेत्यांना नीट समजावून सांगा’
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांना सांगितले की, यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणीही गटबाजी करू नये हे महाराष्ट्रातील नेत्यांना नीट समजावून सांगा. हा आदेश त्यांनी पाळला नाही तर त्यांच्यावर कारवाई करा.
मग दावा कसा करता?
एका गटाने नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पक्षाध्यक्षपदावरून दूर करा, अशी मागणी केली. अशा मागण्या होऊनही महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये गटबाजी नाही, असा दावा तुम्ही कसा काय करता? असा
जाब खरगे यांनी नेत्यांना विचारला.