नवी दिल्ली - श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी आपल्या निवासस्थानी येण्यात काहीही चुकीचे नसल्याचे सांगून अशा मुद्द्यावर राजकीय परिपक्वतेची गरज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केली.
येथे एका कार्यक्रमात बाेलताना न्या. चंद्रचूड म्हणाले, सामाजिक पातळीवर विचार करता न्यायपालिका आणि कार्यपालिकांशी संबंधित व्यक्तींच्या सतत बैठका हाेत असतात. प्रजासत्ताक दिन किंवा इतर वेळी आम्ही राष्ट्रपती भवनात भेटत असतो. पंतप्रधान किंवा मंत्र्यांशी आम्ही चर्चा करतो. यात आम्हाला जे निकाल द्यावयाचे असतात त्यासंबंधी नव्हे, तर सामान्य जीवन आणि सामाजिक मुद्द्यांवर चर्चा होत असते. न्यायपालिका व कार्यपालिकेतील अधिकारांच्या वर्गीकरणाचा असा अर्थ होत नाही की, दोघांची भेट व्हायला नको.
अयोध्येतील राममंदिर वादावर तोडगा निघावा म्हणून आपण देवाची प्रार्थना केली होती, असे सरन्यायाधीशांनी म्हटले होते. याबाबत विचारल्यावर न्या. चंद्रचूड म्हणाले, मी एक श्रद्धाळू माणूस आहे. सर्वच धर्माचा समान स्वरूपात मी सन्मान करतो. माझ्या निवृत्तीनंतर न्यायालय सुरक्षित हाती आहे, असे सांगून ते म्हणाले की, न्या. संजीव खन्ना हे अतिशय शांत स्वभावाचे आहेत. न्यायाधीशांवर संशय व्यक्त करणे म्हणजे यंत्रणेची बदनामी करण्यासारखे आहे.