बसले, झोपले त्याचठिकाणी काळाने गाठले; अद्याप किती बेपत्ता याचा पत्ता लागेना, मात्र शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 05:30 AM2024-08-01T05:30:16+5:302024-08-01T05:31:53+5:30

आक्रोशाच्या किंकाळ्यांनी काळीज हेलावले; वायनाड येथे बचावकार्याला वेग

it is not yet known how many are missing but the search is on in wayanad after landslide | बसले, झोपले त्याचठिकाणी काळाने गाठले; अद्याप किती बेपत्ता याचा पत्ता लागेना, मात्र शोध सुरू

बसले, झोपले त्याचठिकाणी काळाने गाठले; अद्याप किती बेपत्ता याचा पत्ता लागेना, मात्र शोध सुरू

वायनाड :केरळमधीलवायनाड जिल्ह्यात दरडी कोसळल्याने आणि आलेल्या पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या गावांत बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. यावेळी घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह अपघाताच्या वेळी ज्या स्थितीत घरात होते त्याच स्थितीत बाहेर काढण्यात येत आहेत. बचाव पथकाने घरांमधून बसलेल्या आणि झोपलेल्या स्थितीत काही मृतदेह बाहेर काढले, जे हृदय हेलावणारे होते. सध्या चार गावांमध्ये लष्कराचे जवान चिखलात अडकलेल्या घराचे छत फोडून त्यामधून दोरीच्या सहाय्याने घराच्या आत जाताना आणि ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत.

एका स्थानिकाने सांगितले की, त्याने खुर्च्यांवर बसलेले आणि खाटांवर पडलेले चिखलाने माखलेले मृतदेह पाहिले. मंगळवारी पहाटे दुर्घटना घडली तेव्हा मृत व्यक्ती बसलेले किंवा झोपलेले असावेत. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. विविध बचाव यंत्रणांनी या घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आहे.अनेक लोक बेपत्ता असून,  शेकडो लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शक्यता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे मंगळवारी पहाटे अनेक दरडी कोसळल्या, त्यातच महापूर आल्याने दरडींच्या मलब्याने घरादारासह सर्व काही वाहून नेले.

रेड अलर्ट देण्यावरून सुरू झाला वाद

गृहमंत्री शाह म्हणाले...

वायनाडमधील लोकांच्या पाठीशी खडकाप्रमाणे उभे राहण्याची ही वेळ आहे, यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, भारतामध्ये जगातील सर्वात आधुनिक “अर्ली वॉर्निंग सिस्टम” आहे आणि ती आपत्तीच्या सात दिवस आधी अंदाज देते. या प्रणालीचा वापर करण्यासाठी २३०० कोटी रुपये खर्च केले गेले आहेत. किमान एक आठवडा आधी राज्य सरकारला केरळमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी केंद्राने २३ जुलै रोजी एनडीआरएफची आठ पथके पाठविली होती. असे असताना राज्य सरकार सतर्क झाले नाही. 

केरळचे मुख्यमंत्री विजयन म्हणाले...

अतिवृष्टीमुळे वायनाडमध्ये नैसर्गिक आपत्ती होईल, हा राज्य सरकारला २३ जुलै इशारा दिला होता. हा  गृहमंत्री अमित शाह यांचा दावा केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी फेटाळून लावला. विजयन म्हणाले की, दरडी कोसळण्यापूर्वी हवामान विभागाने जिल्ह्यासाठी फक्त ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला होता. मात्र जिल्ह्यात ५०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला, जो हवामान विभागाच्या अंदाजापेक्षा खूप जास्त होता. मंगळवारी दरड कोसळल्यानंतरच येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला. ही वेळ एकमेकांना दोष देण्याची नाही, असे ते म्हणाले.

प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू

मृत्युमुखी पडलेल्या प्रियजनांना ओळखून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करताना कुटुंबातील सदस्यांच्या दुःखाच्या आणि आक्रोशाच्या किंकाळ्यांनी प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. मृत्युमुखी पडलेल्या सर्वांचे मृतदेह मेपाडी आणि निलांबूर शासकीय रुग्णालयात  ठेवण्यात आले होते. प्रत्येकजण आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे मृतदेह ओळखून त्यांना शेवटचे पाहत होता. यावेळी त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. असेच चित्र स्मशानभूमीतही होते. अनेक मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार केले गेले.  अशी भयानक दुर्घटना आपण केरळमध्ये कधीही पाहिली नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नेमके किती बेपत्ता? शोध सुरू

दरड कोसळल्यानंतर नेमके किती लोक बेपत्ता झाले आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी अधिकारी माहिती घेत आहेत. येथे राहणाऱ्या नागरिकांची संख्या, अपघातानंतर सापडलेल्या नागरिकांची आणि बेपत्ता लोकांची संख्या तपासण्यासाठी माहिती गोळा केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. 

वायनाडवरून लोकसभेत गोंधळ

भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी वायनाडमधील ‘अतिक्रमण’वरून राज्य सरकार आणि काँग्रेसवर प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभेत गोंधळ घातला. सूर्या म्हणाले की, राज्याच्या वनमंत्र्यांनी केरळ विधानसभेत सांगितले होते की, धार्मिक संघटनांच्या दबावामुळे बेकायदेशीर अतिक्रमण हटवता येत नाही. वायनाडचे खासदार असलेल्या राहुल गांधी यांनी तेथील नैसर्गिक आपत्तीबाबत कधीही आवाज उठवला नाही, असे म्हटल्यानंतर विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज काही वेळ तहकूब केले होते. यानंतर सूर्या यांच्या भाषणातील शिष्टाचारानुसार नसलेला भाग काढून टाकण्यात येईल, असे अध्यक्षांनी सांगितले.
 

Web Title: it is not yet known how many are missing but the search is on in wayanad after landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.