‘सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 10:31 IST2025-04-04T10:30:33+5:302025-04-04T10:31:19+5:30
Rahul Gandhi News: काँग्रेसने गुरुवारी अमेरिकेने भारतावर २७ टक्के शुल्क लादल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली आणि सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकार यावर काय करणार आहे, असा सवाल केला.

‘सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे’
नवी दिल्ली - काँग्रेसने गुरुवारी अमेरिकेने भारतावर २७ टक्के शुल्क लादल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली आणि सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकार यावर काय करणार आहे, असा सवाल केला.
राहुल गांधी म्हणाले की, आमच्या भागीदार देशाने (अमेरिकेने) २७ टक्के शुल्क लावले आहे, ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, आपल्या औषध उद्योग आणि शेतीसह सर्वच क्षेत्रावर याचा परिणाम होणार आहे. सरकार यावर काय करणार आहे, ते सांगावे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही पंतप्रधानांवर निशाणा साधला आणि म्हटले की, अमेरिकेने भारतावर अतिरिक्त शुल्क लादल्याने अमेरिकन नेतृत्व एक व्यापारी आहे आणि "आमचा ग्राहक" त्याच्या जाळ्यात अडकला असल्याचे दिसते.
काँग्रेस खासदार मनीष तिवारी म्हणाले की, अतिरिक्त शुल्क लादणे, हे भारत सरकार आणि ट्रम्प प्रशासन यांच्यातील चर्चेचे पूर्ण अपयश आहे. समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी टीका करत म्हटले की, एकतर्फी प्रेम करून आणि एखाद्याला मित्र म्हणण्याने देशाची विश्वासार्हता आणि ताकद वाढत नाही. अमेरिका भारताशी अशी का वागली, याचे सरकारला उत्तर द्यावे, असे त्यांनी सांगितले.