नवी दिल्ली : अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसने राजकारण करू नये, असा निवडणूक आयोगाने दिलेला आदेश अत्यंत चुकीचा आहे. सरकारच्या धोरणावर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी गुरुवारी म्हटले आहे.
जात, धर्म, भाषा, समुदाय यांचा आधार घेऊन भाजप व काँग्रेसने निवडणुकांत प्रचार करू नये, असा इशारा या दोन्ही पक्षांना निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. संरक्षण दलांविषयीच्या धोरणांबद्दल तसेच त्या दलांच्या सामाजिक-आर्थिक रचनेबाबत फूट पाडणारी विधाने करू नयेत, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला बजावले होते. अग्निपथ योजनेविषयी काँग्रेसने केलेल्या टीकेबद्दल निवडणूक आयोगाने हा इशारा दिला होता. त्याबद्दल पी. चिदंबरम यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अग्निवीर प्रस्तावाला लष्कराचाही होता विरोधचिदंबरम म्हणाले की, अग्निवीर तयार करण्याच्या प्रस्तावाला लष्कराचाही विरोध होता. तरीही ही योजना केंद्र सरकारने राबविण्याचे ठरविले. हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्यामुळे ही योजना रद्द करणे आवश्यक बनले आहे.
नेमके काय म्हणायचेय?- आयोगाला नेमके काय म्हणायचे आहे? अग्निपथ या योजनेतून अग्निवीर तयार होतात. ते सरकारचे धोरण आहे.- त्यावर टीका करू नका, असे निवडणूक आयोगाला म्हणायचे आहे का? सरकारवर टीका करणे हा विरोधकांचा हक्क आहे. विरोधक सत्तेवर आले तर अग्निपथ योजना रद्द करण्यात येईल, असे सांगणेही चुकीचे नाही, असेही पी. चिदंबरम म्हणाले.