नवी दिल्ली: तुम्ही अनेकदा भांग, गांजा हे शब्द ऐकले असतील. महाराष्ट्रासह देशभरात सध्या गाजत असलेल्या आर्यन खान प्रकरणानंतर गांजा आणि ड्रग्ज चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की नशा आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तरीही हे पदार्थ जगभरात विकले आणि खरेदी केले जातात. अनेक ठिकाणी भांगेला सरकारकडून परवानगी मिळालेली आहे तर गांजा विकण्यास बंदी आहे. दोन्ही पदार्थ एकाच वनस्पतीतून तयार होतात, पण एकाला परवानगी आणि दुसऱ्यावर बंदी का ?
भांग आणि गांजा काय फरक आहे?
भांग आणि गांजा एकाच प्रजातीच्या वनस्पतीपासून बनवले जातात. ही प्रजाती नर आणि मादीमध्ये विभागली गेली आहे, भांग नर प्रजातीपासून बनविली जाते आणि गांजा मादी प्रजातीपासून बनवला जातो. पण भांग आणि गांजा बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. वनस्पतीच्या फुलापासून गांजा तयार करुन तो वाळवला जातो आणि नंतर धुम्रपानात याचा वार केला जातो. याशिवाय काहीजण अन्न किंवा पेय स्वरुपातही याचा वापर करतात. दुसरीकडे, भांग पानांपासून तयार केली जाते. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर गांजा फुलांपासून तयार केला जातो आणि भांग पानांपासून बनवली जाते.
कायदा काय सांगतो?
एकेकाळी देशात गांजाचा खुलेआम वापर केला जात होता, परंतु 1985 साली भारताने गांजाच्या वनस्पतीच्या वापरावर बंदी घातली. म्हणजे नार्कोटिक्स आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यात गांजाची फळे आणि फुले यांच्यावर बंदी घातली, पण पानांवर नाही. काही राज्यांमध्ये भांग अजूनही बेकायदेशीर आहे. असाम आणि महाराष्ट्रात परवाना नसताना भांगेपासून बनवलेले पदार्थ वाढवणे, ठेवणे, वापरणे किंवा सेवन करणे बेकायदेशीर आहे. दुसरीकडे, गुजरातने 2017 मध्ये भांगला कायदेशीर केलं होतं.
ही वनस्पती औषध म्हणूनही वापरली जाते
हिमालय पर्वताच्या आसपासच्या राज्यांमध्ये ही वनस्पती जागोजागी वाढते. या वनस्पतीचा वैद्यकीय क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वापर होतो. या वनस्पतीचे सर्व भाग आयुर्वेदात विविध औषधे आणि उपचारांसाठी वापरले जातात. याशिवाय त्याला एक व्यावसायिक पैलूही आहे. या वनस्पतीचा वापर लाकूड आणि कापड उद्योगात देखील मोठ्या प्रमाणात केला जातो.