नवी दिल्ली: इंटरनेटवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेटबाबत भारत सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गुन्हेगारी आणि हानिकारक मजकूर आढळून आल्यानंतर, त्या प्लॅटफॉर्मने कारवाई न केल्यास, कलम 79 अंतर्गत कंपनीचे संरक्षण काढून घेतले जाईल.
मंत्रालयाने एक्स, यूट्यूब आणि टेलिग्राम यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरुन बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेट काढून टाकण्यासाठी नोटीस जारी केली आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या नोटीसमध्ये, असे म्हटले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने अशी व्यवस्था करावी, जेणेकरून बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेट आपोआप ब्लॉक केला जाईल. यासाठी तुमचा अल्गोरिदम बदला आणि यंत्रणा सुधारा. या सूचनांचे पालन न केल्यास ते आयटी कायदा 2021 च्या नियम 3(1)(b) आणि नियम 4(4) चे उल्लंघन मानले जाईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यानंतर कंपनीला संरक्षण देणाऱ्या IT कायद्याच्या कलम 79 अंतर्गत संरक्षण काढून घेतले जाईल.
केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X, YouTube आणि टेलिग्राम यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर बाल लैंगिक शोषणाशी संबंधित कंटेट काढून टाकण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी कारवाई करावी, अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते.