नवी दिल्ली : पाकिस्तानची लढाऊ विमाने बुधवारी भारताच्या हद्दीत शिरताच विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी ही माझी शिकार आहे, असे सहकाऱ्यांना सांगितले आणि पाकिस्तानचे एफ-१६ विमान एका मिनिटाच्या आतच उडवून टाकले, अशी माहिती समोर आली आहे.ते विमान उडवण्याआधी अभिनंदन वर्धमान यांनी त्याचा पाठलाग केला. पाठलाग करताना तेही पाकिस्तानी हद्दीत चुकून शिरले. तिथे त्यांनी एफ-१६ विमान पाडलेच, पण पाकच्या विमानानेही त्यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे त्यांचे विमानही कोसळले आणि त्यांना पॅराशूटच्या साह्याने त्यातून खाली उडी घ्यावी लागली. तिथे पाकिस्तानातील रहिवाशांनी त्यांना पोलिसांच्या नंतर लष्कराच्या ताब्यात दिले.पाकिस्तानची एफ-१६ विमाने भारताच्या हद्दीत घुसत असल्याचे पाहताच, सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाची विमानेही आकाशात झेपावली. नौशेरा विभागातील आकाशात भारत व पाकिस्तानच्या विमानांमध्ये चकमक सुरू झाली. कुरघोडी आणि हुलकावण्यांचे खेळ सुरू झाले. याला हवाई युद्धाच्या भाषेत ‘डॉग फाइट’ म्हटले जाते.मिग-२१ विमान उडवत असलेल्या अभिनंदन यांनी १५ हजार फुटावरून पाकिस्तानचे विमान पाहिले. ते ८ हजार फूट उंचीवर होते. एकमेकांना हुलकावणी दिली जात असताना, विंग कमांडर अभिनंदन यांनी एफ-१६ विमानावर आर-७३ हे क्षेपणास्त्र डागले. मात्र एफ-16 विमानाच्या वैमानिकानेही मिग-२१ विमानावर प्रतिवार केला. या चकमकीत दोन्ही विमाने कोसळली. सुदैवाने अभिनंदन वर्धमान हे प्रसंगावधान राखून विमानातून बाहेर पडले. मात्र हवेच्या झोतामुळे त्यांचे पॅराशूट पोहाचले पाकव्याप्त काश्मीरमध्ये.>पाकच्या वैमानिकाला भारतीय समजून केले ठारपाकच्या वैमानिक शाहनाझ यांनीही आपल्या विमानातून पॅराशूटने खाली उडी घेतली. तोही पाकिस्तानातील एका गावात पडला. त्याआधी अभिनंदन यांना काही लोकांनी पाहिले होते आणि ते भारतीय असल्याचे त्यांना समजले होते. त्यामुळे हा दुसरा वैमानिकही भारतीयच असावा, असा संशय पाकिस्तानातील गावकऱ्यांना आला. त्यांनी त्या वैमानिकाला बेदम मारहाण केली. त्या मारहाणीतच तो ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. कॅप्टन शाहनाझ यांच्या कुटुंबातील अनेक जणही लष्कर व हवाई दलात होते.
ही माझी शिकार आहे, असे सांगत अभिनंदननी उडवले पाकचे विमान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:12 AM