नवी दिल्ली : दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर प्रतिकूल परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही, असे स्पष्टपणे म्हटले आहे.वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने आयोजित केलेल्या आर्थिक शिखर परिषदेत बोलताना कांत म्हणाले की, पर्यटकांनी काय खावे आणिकाय प्यावे, यात राज्य सरकारांनी पडण्याचे कारण नाही. पर्यटकांनी काय खावे, काय प्यावे, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा सरकारांशी काहीच संबंध नाही. ज्या राज्यांनी गोमांस आणि दारूवर बंदी घातली आहे, त्यांनी दुबईचे उदाहरण समजूनच घेतलेले नाही. देशाने व संबंधित राज्यांनी पर्यटकांना आवश्यक असलेली प्रत्येक सुविधा पुरविण्याची गरज असते.अमिताभ कांत म्हणाले की, पर्यटन हा व्यवसाय मुळातच सुसंस्कृतता आणि सभ्यतेचा व्यवसाय आहे. एकीकडे कचरा आणि घाण यांचे ढिगारे असताना, आमच्याकडे महान वारसा स्थळे आहेत, असा दावा तुम्ही करूच शकत नाही. भारताने स्वच्छतेवर भर द्यायला हवा. दुसरे म्हणजे पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन अविस्मरणीय व्हायला हवे.अलीकडेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ आणि दमन या चार राज्यांनी दारूबंदीची योजना आखली आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि मणिपूर या राज्यांत यापूर्वीच दारूबंदी लागू आहे. दारूबंदीच्या समर्थकांच्या मते, जगात व्हिस्कीची सर्वाधिक विक्री भारतात होते. त्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. याशिवाय दारू पिऊन वाहने चालविल्यामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड आहे. या पार्श्वभूमीवर दारू पिणे, हीच एक मोठी समस्या बनली आहे. त्यावर दारूबंदी हाच उपाय आहे.दारूबंदीमुळे पर्यटन उद्योगावर विपरित परिणाम होत आहे, हे आपले मत आपण राजकीय नेतृत्वाला सांगणार का, या प्रश्नावर कांत यांनी म्हटले की, मी हे वारंवार सांगत आलो आहे. आपल्या देशातील पर्यटन हा पर्यटकांसाठी एक चांगला अनुभव ठरायला हवा.दिवसभराचा थकवा घालविण्याची त्यांना गरज असते. भारतीय संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर योग्य आदरातिथ्य करून, त्याची संध्याकाळ तुम्ही अविस्मरणीय करायला हवी.
पर्यटकांनी काय खावे अथवा काय प्यावे, हा सरकारचा विषयच नाही - अमिताभ कांत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2017 2:24 AM