नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूचा फैलाव वाढत चालला असून देशात दुबळी आरोग्य व्यवस्था उघड झाली. डॉक्टर्स, परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांना असहाय करून साेडले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सकारात्मकता निर्माण व्हावी यासाठी कार्यक्रम आयोजित केले जावेत आणि त्यादिशेने पावले टाकावीत, अशी योजना तयार केल्याचे समोर आल्यावर या कार्यक्रमावर अनेक विऱोधी पक्षांनी आणि विश्लेषकांनी टीका केली आहे.बुधवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की,‘वाळूत तोंड खुपसून घेणे म्हणजे सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’ निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही भाजप-संघाच्या योजनेवरून सरकारवर ट्वीटरद्वारे टीका केली. ते म्हणाले,‘देश शोकात असताना आणि आमच्या चारही दिशांना वेदनादायी घटना घडत असताना सकारात्मकतेच्या नावावर खोटेपणा आणि प्रचार करणे लाजिरवाणी बाब आहे. सकारात्मक व्हायचे असेल तर आम्हाला आंंधळे होऊन सरकार प्रचार वा गाजावाजा करणारे बनायला नको आहे.’खासदार राहुल गांधी यांनी त्या कार्यक्रमाबाबत प्रसारमाध्यमात आलेल्या एका बातमीचा हवाला देऊन म्हटले की, ‘सकारात्मक विचारांचा खोटा दिलासा हा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती गमावली, जे रुग्णालयात प्राणवायू, औषधांच्या टंचाईला तोंड देत आहेत आणि आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची थट्टा करणारा आहे. वाळूत तोंड खुपसून बसणे ही सकारात्मकता नाही तर देशवासीयांची फसवणूक आहे.’
व्याख्याने होणार...- व्याख्याने, भाषणे होतील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ‘सकारात्मकता असीमित’ नावाचा एक ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध प्रेरक, धार्मिक गुरू आणि प्रमुख उद्योगपतींची- व्याख्याने आणि भाषणांचा समावेश असणार आहे. या कार्यक्रमाचा विषय सकारात्मकता पसरवण्याचा असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन - भागवतदेखील या सकारात्मकता अभियानाअंतर्गत राष्ट्राला संबोधित करू शकतील.