नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज बनणे शक्य नाही; परंतु, ‘सेवाजी’ बनू शकतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी अभिवादन केले. भारतमातेचे अमर सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतश: प्रणाम. त्यांचे साहस, उत्तुंग शौर्य आणि असामान्य बुद्धिमत्ता यांची गाथा देशवासीयांना युगानुयुगे प्रेरणा देत राहील. जय शिवाजी! अशी भावना मोदींनी ट्वीवटरवरून व्यक्त केली.मोदी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज देशात शतकांपासून प्रेरणास्रोत राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या संस्कारांप्रमाणे सरकारने राष्ट्र रक्षा आणि राष्ट्रवादाला प्राथमिकता दिली आहे. महाराजांनी राष्ट्र रक्षणाकरिता सशस्र सेनेला प्राधान्य दिले. त्याकाळात शिवाजी महाराजांनी नौसेनेची बांधणी केली. त्यामुळे सरकारने भारताच्या लष्कराला जगातील इतर शक्तिशाली लष्कराच्या श्रेणीत उभे केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज होणे शक्य नाही. परंतु, सव्वाशे कोटी देशवासीय ‘सेवाजी’ बनू शकतात. आपण शिवाजी बनू शकलो नाही तरी ‘सेवाजी’ बनू शकतो. दररोज एक सेवेचे काम केले तरी शिवाजी महाराजांच्या स्वप्नांना सेवेच्या माध्यमातून संपन्न केले जाऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र सदनात जल्लोष! छत्रपती संभाजी राजे यांनी नवीन महाराष्ट्र सदनात शिवाजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दिल्लीतील असंख्य मराठी लोक यावेळी उपस्थित होते. जय शिवाजीच्या घोषणांनी सदनाचा परिसर दुमदुमला होता.
ऑनलाइन व्याख्यान! महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त ‘शिवरायांचे संघटन कौशल्य’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक गणेश आष्टेकर यांनी विचार मांडले. शिवाजी महाराजांच्या गुणग्राहकतेतून व दूरदृष्टीतून स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या मावळ्यांचे संघटन निर्माण झाले. भारतात श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने संघटन कौशल्याचे उत्तम आदर्श बघायला मिळतात. या दोन्ही महान व्यक्तीमत्त्वांनी संघटन कौशल्याच्या जोरावर आपल्या सवंगड्यांना एकत्र करून स्वराज्याची व अस्मितेची मोट बांधली.