ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - आरबीआय गर्व्हनर रघुराम राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. ' टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक विषयांवर मत मांडले.
भाजपचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांना पदावरून तातडीने हटवावे अशी मागणी केली होती. दोन पानी पत्रात स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर कठोर टीका करत राजन हे मनाने पूर्णपणे भारतीय नसल्याचा आरोप केला होता. त्यावरून मोठा वाद झाला होता. तर गेल्या आठवड्यात खुद्द रघुराम राजन यांनीच आरबीआय गव्हर्नर म्हणून आपण दुसरा कार्यकाळ भूषवणार नसल्याचे म्हटले होते. चार सप्टेंबरला कार्यकाळ संपल्यानंतर ते पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे वळणार आहेत.
राजन यांच्यावर झालेली टीका अयोग्य असल्याचे सांगताना रघुराम राजन हे अन्य कुणाहीपेक्षा कमी देशभक्त नाहीत असे स्पष्ट उद्गार नरेंद्र मोदींनी काढले आणि सुब्रमण्यम स्वामींना उल्लेख न करता योग्य तो धडा दिला. प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करणं देशाच्या हिताचं नसल्याचं मोदी म्हणाले.
रघुराम राजन यांच्याबरोबर मला काम करायचा अनुभव आहे. ते अत्यंत निष्ठावान आहेत, आणि ते जिथं कुठं असतिल तिथून भारतासाठीच काम करतिल असे प्रशंसोद्गारही मोदींनी काढले. सप्टेंबर पर्यंत म्हणजे मुदत संपेपर्यंत राजन आरबीआयचे गव्हर्नर राहतिल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
पाकिस्तानच्या बाबतीत आपल्याला नेहमी काळजीपूर्वक रहावे लागेल असं मोदी म्हणाले. पाकिस्तानशी वागताना लक्ष्मणरेखा काय असेल असा सवाल विचारत मोदींनी पाकिस्तान सरकारमधले व सरकारच्या बाहेरचे असे अनेक गट दहशतवादी कारवायामध्ये गुंतलेले असतात याकडे लक्ष वेधले.
आणखी बातम्या :
राजन यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करणे गैर असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये होणारा सुब्रमण्यम स्वामी यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी राजन यांच्या मुद्यावर मौन सोडत ' कुठल्याही राजकीय पक्षाकडून राजन यांच्यावर टीका करणे योग्य नाही' असे म्हटले असून सुब्रमण्यम स्वामी यांना अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.
विदेशामधल्या काळ्या पैशांसदर्भात आम्ही प्रचंड काम केलं असल्याचं मोदी म्हणाले. 2011 ते 2014 या तीन वर्षात सुप्रीम कोर्टाने सांगूनही आधीच्या सरकारनं SIT नेमली नाही, जे काम आम्ही सरकार स्थापन केल्यावर लगेच केलं असं त्यांनी सांगितलं. आम्ही जगातल्या अनेक देशांशी काळ्या पैशांसदर्भात करार केले आहेत आणि स्वित्झर्लंड सारखा देश स्वत:हून आता आपल्याशी चर्चा करत आहे, असं त्यांनी सांगितलं.
GST बिल संमत होणं ही गरीब राज्यांची गरज आहे. उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, ओरीसा अशा सगळ्या गरीब राज्यांना GST चा फायदा होणार आहे. मात्र, एका पक्षाने हे विधेयक अडवून ठेवलं आहे. मी हे विधेयक संमत होण्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यासाठी गरज पडली तर कुणाच्या घरी चहा प्यायलाही मी जायला तयार आहे असं मोदी म्हणाले.
उत्तर प्रदेशमधल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, विकास हाच आमचा मंत्र आहे. कुठलीही भडकाऊ भाषणं देणं योग्य नसल्याचं सांगतना मोदींनी अशा लोकांना हीरो करू नका असा सल्ला मोदींनी दिला.