मुंबई - जनतेला स्वप्ने दाखवणारे नेते चांगले वाटतात. पण दाखवलेल्या स्वप्नांची, आश्वासनांची पूर्तता झाली नाही की, तेच लोक या नेत्यांची पिटाई करतात, असे वक्तव्य भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमामध्येच अभिनेत्री ईशा कोप्पीकर हिने भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमात उपस्थितांशी संवाद साधताना गडकरी म्हणाले, ''स्वप्ने दाखवणारे नेते लोकांना चांगले वाटतात. पण दाखवलेली स्वप्ने पूर्ण झाली नाहीत की तेच लोक त्यांची पिटाईसुद्धा करतात. त्यामुळे स्वप्ने तीच दाखवा जी पूर्ण होऊ शकतील. मी स्वप्ने दाखवणाऱ्यांपैकी नाही. मला कुणी पत्रकार विचारू शकत नाही. मी जे बोलतो ते 100 टक्के करून दाखवतो.'' यावेळी गडकरींनी आपल्या मंत्रालयाने केलेल्या कामांचाही उल्लेख केला.'' दिल्लीमध्ये आम्ही नवीन रस्ते बांधले. त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण 27 टक्क्यांनी कमी करण्यात आम्हाला यश आले. माझ्या विभागामार्फत 2 हजार ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यात आले. आम्ही महाराष्ट्रात पाच लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची बांधणी सुरू केली आहे. आम्ही मुख्यत्वेकरून चार आणि सहा पदरी रस्ते बांधत आहोत कारण मोठ्या रस्त्यांमुळे इंधनाच गरज कमी होते, असे गडकरींनी सांगितले.
माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात एका भव्य सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रणित राष्ट्रीय स्तरावरच्या नवभरतीय शिव वाहतूक संघटनेचा उद्घाटन सोहळा दुपारी पार पडला. याच वेळी सिनेअभिनेत्री ईशा कोपीकरचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश झाला. ईशा कोपीकरला वाहतूक संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देत केंद्रीयमंत्री गडकरी यांनी तीचे पक्षात स्वागत केले.