मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी व हिरे व्यावसायिक नीरव मोदी याला भारतात आणण्यास म्हणजेच, त्याच्या प्रत्यार्पणाला पीएमएलए न्यायालयाने मंगळवारी परवानगी दिल्यामुळे त्याला आणण्याची कायदेशीर प्रक्रिया आता सुरू होईल.पंजाब नॅशनल बँकेचे सुमारे १३ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून नीरव मोदी पासपोर्ट रद्द केल्यानंतरही वेगवेगळ्या देशांत मुक्तपणे फिरत आहे. तो १२ जूनपर्यंत ब्रिटनमध्ये होता. सध्या तो बेल्जियममध्ये असल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाला (ईडी) मिळाली आहे. त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी ईडीने सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता. विशेष न्यायालयाने मंगळवारी हा अर्ज मंजूर केल्याची माहिती ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी दिली.सक्तवसुली संचालनालयाने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात एकूण २४ आरोपींचा उल्लेख आहे. त्यात मोदीचे वडील, भाऊ, बहीण, मेव्हणा व मामा मेहुल चोकसी यांचा समावेश आहे.नीरव मोदीचा मामा असलेल्या मेहुल चोकसीबाबत कुठलीही माहिती सध्या तरी तपास यंत्रणांकडे नाही. गीतांजली ज्वेलर्स, सोलार एक्स्पोर्ट्स, स्टेलार डायमंड या फर्म्सवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.इंटरपोलचे वॉरंट अद्याप नाहीसक्तवसुली संचालनालयाने मे महिन्यात नीरव मोदीवर आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर, त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती विशेष न्यायालयाला करण्यात आली. न्यायालयाने ती मान्य केली. मात्र, इंटरपोलने अद्याप नीरव मोदीविरोधात वॉरंट जारी केलेले नाही.ईडीने नीरव मोदी व त्याचा मामा चोकसी यास अनेक वेळा समन्स बजावले. मात्र, त्या दोघांनी आरोग्याचे कारण पुढे करत आणि व्यवसायाची सबब पुढे करत ईडीपुढे हजर राहणे टाळले.पीएनबीने गैरव्यवहाराबाबत सीबीआयकडे पहिली तक्रार दाखल करण्याच्या आधीच नीरव मोदी व मेहुल चोकसी देशातून परागंदा झालेले होते.
नीरव मोदी याला परत आणणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 6:42 AM