हैदराबाद: हैदराबादमधील हेटेरो फार्मास्युटिकल ग्रुपवर छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या हाती मोठं घबाडं लागलं आहे. छापेमारीदरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑफिसच्या कपाटात तब्बल 142 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. पैशाने भरलेलं कपाट पाहून छापा टाकणारे अधिकारीही चक्रावून गेले. या कंपनीचे बहुतांश उत्पादने अमेरिका, युरोप, दुबई आणि इतर आफ्रिकन देशात निर्यात केले जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने 6 राज्यांमध्ये सुमारे 50 ठिकाणांवर शोधमोहीम राबवली होती. यात अधिकाऱ्यांना अकाउंट्स बूक आणि रोख रक्कम सापडली होती. याशिवाय, पेन ड्राइव्ह, कागदपत्रे इत्यादी स्वरुपातील अनेक पुरावेदेखील आढळले. आयकर विभागाकडून या सर्व वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या छापेमारीदरम्यान बनावट आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांकडून केलेल्या खरेदीतील अनियमितताही आढळून आली आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सच्या मते, हैदराबाद येथील या अग्रगण्य फार्मास्युटिकल कंपनीवर 6 ऑक्टोबर रोजी छापेमारी करण्यात आली होती. यादरम्यान अधिकाऱ्यांना सुमारे 550 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे. अघोषित उत्पन्न आणि इतर गोष्टी शोधण्यासाठी अधिक तपास केला जात आहे.