लखनौ - उत्तर प्रदेशमधील अजून एका अत्तर व्यावयासिकाच्या घरामध्ये कोट्यवधी रुपयांच्या रोकडीचे घबाड सापडले आहे. काही दिवसांपूर्वी पीयूष जैनच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम मिलाल्यानंतर प्राप्तिकर विभागाला कन्नोजमधील अजून एक अत्तर व्यावसायिक मोहम्मद याकूब मलिक यांच्या घरातून मोठ्या संख्येने रोख रक्कम मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मलिक यांच्या घरामध्ये सुमारे चार तासांपासून नोटांची मोजणी करणाऱ्या मशीनच्या माध्यमातून नोटांची मोजणी सुरू आहे. तसेच यामधून सुमारे ३ ते ४ कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. एवढेच नाही तर या छाप्यामध्ये प्राप्तिकर विभागाने काही प्रमाणात सोनेही जप्त केले आहे. याची माहिती नोटांच्या मोजणीमध्ये सहभागी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याने दिली आहे. मात्र आतापर्यंत याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कन्नौजमधील अत्तर व्यावसायिक मोहम्मद याकूब मलिक यांच्या घरी गेल्या २४ तासांपासून प्राप्तिकराची धाड सुरू आहे.
एचडीएफसी बँकेचे कर्मचारी नोटा मोजण्याची मशीन घेऊन मलिक मियाँ यांच्या घरी आले होते. येथे मशीनच्या माध्यमातून नोटांची मोजणी सुरू होती. नोटांच्या मोजणीमध्ये सहभागी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याने बाहेर येऊन सांगितले की, या तीन-चार तासांच्या मोजणीमध्ये सुमारे २ ते ४ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार या धाडीमध्ये काही प्रमाणात सोनेही सापडले आहेत. सध्ये मोहम्मद याकुबच्या मंडई आवासामध्ये रुपयांची काऊंटिंग संपली आहे. तसेच मशीनसुद्धा बँकांमध्ये परत पाठवण्यात आल्या आहेत.
मात्र प्राप्तिकर विभागाची टीम अजूनही याकुब मलिकच्या घरामध्ये उपस्थित आहे. तसेच प्राप्तिकर विभागाकडून तपासही सुरू आहे. सांगण्यात येत असलेल्या माहितीनुसार छापेमारी पूर्ण झाल्यानंतर जप्त झालेल्या मालमत्तेबाबत माहिती दिली जाईल. सध्या याकूब मलिकच्या अन्य ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. अत्तर व्यावसायिक पुष्पराज जैन ऊर्फ पम्पी जैन यांच्या कन्नौज येथील घरापासून वेगवेगळ्या ठिकाणी कालपासूनच प्राप्तिकर विभागाकडून छापे टाकले जात आहेत. अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर आता पुष्पराज जैन यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. आयटी विभागाचे हे छापे कन्नौज, कानपूर, नोएडा, हाथरसपासून मुंबईपर्यंत सुरू आहे.