लुधियाना : सुकामेवा विकणाऱ्या दाेन माेठ्या कंपन्यांच्या प्रतिष्ठानांवर प्राप्तिकर खात्याने छापे टाकले आहेत. महाराष्ट्रासह पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि जम्मू आणि काश्मीरमधील कंपन्यांची कार्यालये, तसेच निवासी मालमत्तांवर ही कारवाई करण्यात आली. कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर करचाेरी केल्याचा संशय आहे.
लुधियाना येथील केसरगंज मंडीमध्ये एका कंपनीच्या कार्यालयात प्राप्तिकर खात्याचे अधिकारी गुरुवारीच दाखल झाले हाेते. त्यानंतर कारवाई सुरू झाली. दाेन कंपन्या बदाम, काजू, किशमिश, पिस्ता इत्यादी सुका मेव्याची विक्री करतात. एका कंपनीची अमृतसर आणि दिल्लीत मुख्य कार्यालये आहेत. दुसऱ्या कंपनीचे मुख्यालय जम्मू येथे आहे. देशाच्या विविध राज्यांत दाेन्ही कंपन्यांची कार्यालये आहेत. सुका मेव्याशिवाय कंपन्यांचा माेठा ऑनलाइन व्यवसायही असल्याचे सूत्रांनी सांगितले.
कंपन्यांनी प्रत्यक्ष विक्री आणि नफ्याचे आकडे लपवून प्रचंड करचाेरी केल्याचा प्राप्तीकर खात्याला दाट संशय आहे. मुंबई, अमृतसर, दिल्ली आदी शहरांमधील कार्यालयांमध्ये छापे टाकले आहेत. ही कारवाई आणखी १-२ दिवस चालू शकते, असा अंदाज आहे.
कर चुकविण्यासाठी...- मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तीकर विभागाचे पथक आयात-निर्यातीचा व्यवसाय असलेल्या मोठ्या व्यक्तीच्या शोधात आहे. या व्यक्तीची कंपनी ही पंजाबमधील क्रमांक एकची असल्याचे समजले जाते.- ही कंपनी कर चुकवण्यासाठी बिल न करता रोखविरहीत (कॅशलेस) व्यवहार करीत असल्याचा विभागाचा संशय आहे.- हे गट प्रत्यक्ष विक्री आणि नफा दडवून ठेवून कर चुकवत असल्याचा संशय असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.