ओडिशा आणि झारखंडमध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकून 300 कोटींहून अधिक रुपयांची रोकड जप्त केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. तसेच "जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल" असं म्हणत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
"भाऊ, तुम्हाला आणि तुमचे नेते राहुल गांधी यांनाही उत्तर द्यावं लागेल. हा नवा भारत आहे, इथे राजघराण्याच्या नावाखाली लोकांचं शोषण होऊ देणार नाही. तुम्ही धावून-धावून थकून जाल, पण कायदा तुम्हाला सोडणार नाही. जर काँग्रेस भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर मोदीजी भ्रष्टाचारावर कारवाई करण्याची गॅरंटी आहेत, जनतेकडून लुटलेला प्रत्येक पैसा परत करावा लागेल" असं म्हणत जेपी नड्डा यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
काँग्रेस नेते अविनाश पांडे यांनी रांचीमध्ये सांगितलं की, मीडिया आणि विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या आरोपांना अद्याप पुष्टी मिळालेली नाही. ही धीरज साहू यांची वैयक्तिक बाब आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे पक्षाने स्पष्टपणे सांगितले आहे. तर झारखंड सरकारचे मंत्री आणि काँग्रेस नेते बन्ना गुप्ता म्हणाले की, धीरज साहू आणि त्यांचे वडील मोठ्या कुटुंबातील लोक आहेत. शेकडो वर्षांपासून ते त्यांचा मोठा व्यवसाय करत आहेत.
"देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार, तिथे त्यांनी लुटमार केली, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ"
भाजपाचे नवे आमदार बालमुकुंद आचार्य यांनी काँग्रेस पक्ष आणि धीरज साहू यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. तसेच सर्वांचा हिशोब घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. काँग्रेसविरोधात घोषणाबाजी करताना भाजपा आमदार बालमुकुंद आचार्य म्हणाले की, "कपाटांमध्ये 310 कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे, जनतेला त्यांचे खोटे आरोप माहीत आहेत, सर्व एजन्सी त्यांच्याकडे जमा केलेले पैसे काढून घेतील, दोषींना शिक्षा होईल. संपूर्ण देशात जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे, तिथे त्यांनी लुटमार केली आहे, आम्ही प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेऊ."