काँग्रेस झारखंडचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले आहेत. या छाप्यात आतापर्यंत 100 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. ओडिशा आणि झारखंडमधील काँग्रेस नेत्यांच्या ठिकाणांवर हे छापे टाकण्यात येत आहेत. बुधवारपासून सुरू झालेले हे छापे अजूनही सुरूच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने आयकर विभागाकडून त्या मोजण्यासाठी मोठमोठ्या मशीनचा वापर केला जात आहे.
आयकर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित असलेल्या जागेवर हे छापे टाकण्यात येत आहेत. बुद्धिस्ट डिस्टिलरी ही राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाची कंपनी आहे. धीरज साहू यांचे कुटुंब दारूच्या व्यवसायाशी निगडीत आहे. ओडिशात त्यांचे अनेक दारू बनवण्याचे कारखाने आहेत.
आयकर विभागाने झारखंडमधील बोलनगीर आणि ओडिशातील संबलपूर येथील धीरज साहू यांच्या वडिलोपार्जित घरावर छापे टाकले आहेत. झारखंडमधील रांची आणि लोहरदगा येथील आस्थापनांवरही छापे टाकले जात आहेत. या छाप्यात आतापर्यंत 100 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. रोकड सापडल्याचे फोटोही समोर आले असून त्यात कपाटात मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल ठेवलेले दिसत आहे.
या मुद्द्यावरून राजकारणही तापलं आहे. भाजपाने काँग्रेसला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार दीपक प्रकाश यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, "काँग्रेस खासदाराच्या घरातून एवढी रोकड सापडली असताना, पक्षाने 70 वर्षांत देशाला किती पोकळ करून टाकले आहे, याचा अंदाज येऊ शकतो."
"हेमंत सरकारच्या काळात झालेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्याबद्दल आपण बोलतो तेव्हा तो केवळ आकडा नसून वास्तव आहे, त्याचे एक छोटेसे उदाहरण पुन्हा आपल्यासमोर आहे." भाजपा विधीमंडळ पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अमर बौरी यांनी ट्विट करून टीका केली आहे की, त्यांनी ऐकले आहे की इतकी रोकड सापडली आहे की नोट मोजण्याचे मशीन देखील काम करणे बंद केले आहे. भाजपने याप्रकरणी ईडीकडे चौकशीची मागणी केली आहे.