काँग्रेस खासदार धीरज साहूंकडे नोटांचा डोंगर, रोकड मोजण्यासाठी मशीन अन् कर्मचारी वाढवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:39 PM2023-12-10T17:39:36+5:302023-12-10T17:42:37+5:30
IT Raids On Dheeraj Sahu: आयकर विभागाने काँग्रेस खासदार धीरज साहूंच्या घरातून 300 कोटींची रोकड जप्त केली आहे.
Dhiraj Sahu IT Raid: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसखासदार धीरज प्रसाद साहू चर्चेत आले आहेत. आयकर विभागाने साहू यांच्या झारखंडमधील घरावर छापा टाकून तब्बल 300 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. हा आकडा अजून वाढू शकतो, असा दावा केला जातोय. म्हणूनच, जप्त केलेल्या पैशांची मोजणी लवकर पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने रविवारी (10 डिसेंबर) नोट मोजणाऱ्या मशीनची आणि कर्मचार्यांची संख्या वाढवली आहे.
आतापर्यंतचे सर्वात मोठे ऑपरेशन
आयटी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धीरज साहूंकडून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 300 कोटी रुपयांची रोकड मोजली गेली आहे. अजून बरीच रक्कम मोजणे बाकी आहे, त्यामुळे हा आकडा चारशे कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा छापा असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.
नोटा मोजण्यासाठी आणखी मशीन्स मागवल्या
जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी सुरुवातीला बँक कर्मचाऱ्यांसह 30 हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. पण, आता मोजणी त्वरीत पूर्ण करण्यासाठी आयकर विभागाने सुमारे 40 लहान-मोठ्या मशीन्स तसेच आणखी कर्मचारी मागवले आहेत. राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संलग्न असलेल्या मद्य कंपनीकडून एवढी मोठी रोकड जप्त केल्याने काँग्रेसही त्यांच्यापासून दूर झाले आहे.
पीएम मोदींची काँग्रेसवर टीका
या प्रकरणी काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटले की, "खासदार धीरज साहू यांच्या व्यवसायाशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही." दरम्यान, पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. X वर हसणारा इमोजी शेअर करत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडवली.