मुंबई - सुशांत सिंग राजपूत प्रकरणावरुन कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. शिवसेना आणि कंगनानं एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कंगना राणौतला वाय दर्जाची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येत आहे त्यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून काही गोंधळ होऊ नये यासाठी केंद्राने खबरदारी घेतली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, कंगनाला सुरक्षा देणं हे योग्यच असल्याचं त्यांनी म्हटलंय.
कंगना राणौत आणि शिवसेना यांच्या संघर्षाची सुरुवात कंगनाच्या विधानानं झाली. ज्यात तिने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप करत त्यांनी मुंबईत येऊ नये असं धमकावल्याचं सांगितले. याबाबत कंगनानं ट्विट करुन म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी मला उघडपणे मुंबईत न येण्याची धमकी दिली आहे. मुंबईच्या गल्लोगल्ली स्वातंत्र्याचे नारे लावले जात होते आणि आता उघडपणे धमकी मिळत आहे. मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं तिने म्हटलं होतं. यावरुन कंगना आणि शिवसेनेत चांगलाच वाद रंगलाय.
कंगनाच्या महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, ते वक्तव्य चुकीचं असून त्याचा आम्ही निषेध करतो. त्या वक्तव्याबद्दल कायदेशीर मार्गाने कारवाई करायला हवी. ''एखाद्या व्यक्तीने चुकीचे वक्तव्य केले असेल, त्याचे विचार अयोग्य असतील तर आपण त्यावर आक्षेप नोंदवू शकतो. मात्र, त्या व्यक्तीचा जीव आणि मालमत्तेचे संरक्षण करणे, ही राज्य सरकार आणि संवैधानिक पदावर बसलेल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. तसे होत नसेल तर आपल्याला 'बनाना रिपब्लिक' होण्यास वेळ लागणार नाही. मग आपल्याकडे कायद्याचे राज्य उरणार नाही.'', असे फडणवीस यांनी म्हटले. तुम्हाला एखाद्याचे मत पटत नसेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा. मात्र, संबंधित व्यक्तीचे रक्षण करणे हे संवैधानिक पदावरील व्यक्तींचे कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा पुरवण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
'Y' दर्जाची सुरक्षा
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय दर्जाची सुरक्षा ज्या व्यक्तींना दिली जाते त्यांच्या सुरक्षेसाठी ११ जवान तैनात असतात. यात १ किंवा २ कमांडो, २ पीएसओ यांचा समावेश असतो. मागील वर्षी केंद्राने ११ पेक्षा जास्त लोकांना Y दर्जाची सुरक्षा दिली होती. ज्यात युपीचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांचाही समावेश होता. म्हणजे आता कंगनासाठी १ किंवा २ कमांडो, २ पीएसओ आणि अन्य जवानांचा समावेश असणार आहे. यात एकूण ११ जवान संबंधित व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.
केंद्राकडून कोणकोणत्या सुरक्षा दिल्या जातात?
देशात विविध स्तरावर केंद्रीय गृहमंत्रालय सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी घेते. यात नेत्यांपासून, व्हीआयपी आणि अशा व्यक्तिंना सुरक्षा देतात ज्यांच्या जीवाला धोका आहे. धमकीच्या दर्जाने सुरक्षा सुविधा देण्यात येते. यात X, Y, Z, Z+ अशा विविध दर्जाच्या सुरक्षा असतात. X कॅटेगिरीमध्ये २ पोलीस कर्मचारी, Y कॅटेगिरीमध्ये ११ जवान, Z कॅटेगिरीत २२ जवान यात एनएसजी कमांडोचा समावेश असतो. तर Z+ सुरक्षेत NSG कमांडोसह ३६ जवान सुरक्षेसाठी तैनात असतात. यावर जी सुरक्षा व्यवस्था असते ती म्हणजे एसपीजी..जी देशाच्या पंतप्रधानांना दिली जाते.