ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - भारतात सर्वाधिक रोजगार निर्मिती आयटी क्षेत्रात होते. पण पुढच्या काही वर्षात आयटीमध्ये रोजगार घटण्याची शक्यता आहे. वाढत्या अत्याधुनिकीकरणामुळे २०२१ पर्यंत भारतात माहिती-तंत्रज्ञान उद्योगात (आयटी) ६.४ लाख नोक-या कमी होतील असे अमेरिका स्थित एचएफएस कंपनीने म्हटले आहे.
२०२१ मध्ये जगभरात आयटी उद्योगामध्ये नोक-या नऊ टक्क्यांनी कमी झालेल्या असतील असे एचएफएस कंपनीने म्हटले आहे. भारतासह, फिलीपाईन्स, युनायटेड किंगडम आणि अमेरिका या देशांना फटका बसेल. भारतात आयटी उद्योगाचे प्रतिनिधीत्व करणा-या नॅसकॉम या संघटनेने मात्र दुसरी बाजू मांडली आहे.
नव्या तंत्रज्ञानाने नोक-यांची निर्मिती होते हे एचएफएसने आपल्या अहवालात ध्यानात घेतलेले नाही असे नॅसकॉमने म्हटले आहे. अत्याधुनिकीकरणाचा काही प्रमाणात परिणाम होईल पण नव्या तंत्रज्ञानामुळे वेगवेगळया क्षेत्रात रोजगार निर्मिती होते असे नॅसकॉमचे म्हणणे आहे.