सुनावणीवेळी भरकोर्टात असं काय घडलं..? न्यायाधीश बोलले, "कलियुग आलंय असं वाटतंय"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:06 AM2024-09-25T10:06:41+5:302024-09-25T10:22:06+5:30
न्या. सौरभ श्याम शमशेरी यांनी या याचिकेवर सुनावणी केली, कौटुंबिक न्यायालयाच्या निकालाला पतीने हायकोर्टात आव्हान दिले होते.
प्रयागराज - इलाहाबाद हायकोर्टाने वृद्ध दाम्पत्यांमधील पोटगी प्रकरणात दिर्घ काळ सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. कलियुग आलंय असं वाटतंय, असे खटले चिंतेचा विषय आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे. हे प्रकरण अलीगडचे आहे. त्याठिकाणी ८० वर्षीय मुनेश कुमार गुप्ता हे आरोग्य विभागातून सुपरवायझर म्हणून निवृत्त झालेत. मुनेश कुमार आणि त्यांची पत्नी गायत्री देवी यांच्यात २०१८ पासून संपत्तीवरून वाद सुरू आहे.
या दोघांच्या वादाचे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आणि ते कुटुंब समुपदेशन केंद्राकडे वर्ग करण्यात आले. मात्र, गोष्टी काही बदलल्या नाहीत त्यानंतर दोघेही वेगळे राहू लागले. पत्नी गायत्री देवीने कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. पतीला पेन्शन म्हणून ३५ हजार रुपये मिळतात त्यातून पोटगी म्हणून दर महिना १५ हजार रुपये देण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली परंतु फॅमिली कोर्टाने १६ फेब्रुवारीला त्यांच्या आदेशात ५ हजार पोटगी देण्याचे सांगितले. पतीने या आदेशाला हायकोर्टात आव्हान दिले तिथे यावर सुनावणी सुरू आहे.
अशी कायदेशीर लढाई चिंतेचा विषय
न्या. सौरभ श्याम शमशेरी यांनी या याचिकेवर सुनावणी केली. यावेळी त्यांनी टिप्पणी करताना म्हटलं की, असं वाटतंय कलियुग आलंय, अशी कायदेशीर लढाई चिंतेची बाब आहे. कोर्टाने या दाम्पत्याला सल्ला देण्याचा प्रयत्न केला. गायत्रीने कोर्टाने सांगितले की, आम्ही पोटगीसाठी मागणी केली होती. त्यात कौटुंबिक न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर पतीने कोर्टाच्या आदेशाला आव्हान दिले. हायकोर्टाने गायत्री यांना नोटीस बजावून पुढील सुनावणीपर्यंत काहीतरी तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.