नवी दिल्ली - देशाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, देशाच्या प्रदीर्घ काळापासून परिस्थिती गंभीर झाल्याने आपण सर्वजण येथे आलो आहोत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. आपण घराबाहेर पडून त्याविरोधात आंदोलन करणे ही आपली जबाबदारी आहे. आज तीच वेळ आहे. देश वाचविण्यासाठी आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल असं आवाहन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावरुन केलं आहे. भारत बचाव रॅलीत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, तुम्ही बदलासाठी तयार आहात का? आज जेव्हा मी शेतकरी बांधवांची अवस्था पाहते तेव्हा खूप त्रास होतो. त्यांना आपल्या शेतात योग्य वेळी बियाणे मिळत नाहीत, त्यांना सहज खत मिळत नाही. पाणी आणि वीज उपलब्ध नाही. पिकांना वाजवी किंमत नाही. आमचे कामगार बांधव दिवसभर मजुरीमध्ये गुंतलेले असतात. ते हिवाळा आणि उन्हाळ्याची पर्वा न करता काम करत राहतात. तरीही त्यांना 2 वेळची भाकरी मिळत नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोटे व्यापारी उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांना बँक कर्ज देण्यास सक्षम नाहीत, संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केल्याच्या बातम्या येत आहेत. आज आमचे तरुण अशा बेरोजगारीला तोंड देत आहे जी यापूर्वी कधीही आली नाही. नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांच्या डोळ्यासमोर अंधार आहे असा घणाघात सोनियांनी केला.
तसेच आज महिलांवर होणारे गुन्हे पाहून शरमेने आमची मान खाली जाते. अंधेर नगरी चौपट राजा असं वातावरण देशात आहे. सबका साथ सबका विकास कुठे आहे असा प्रश्न प्रत्येकजण करतोय. रोजगार कुठे गेला? अर्थव्यवस्था का नष्ट झाली? तुम्ही मला सांगा की काळा पैसा आणण्यासाठी आणलेल्या नोटाबंदीमुळे काळा पैसा का बाहेर पडला नाही याची चौकशी झाली पाहिजे. ते काळा पैसा कोणाकडे आहे? जीएसटीनंतरही मोदी सरकारची तिजोरी रिकामी का झाली? देशासाठी फायदेशीर असलेल्या कंपन्या कशा विकल्या जात आहेत आणि कोणाकडे? बँकांमध्येही सार्वजनिक पैसे सुरक्षित नाहीत असे अनेक प्रश्न सोनिया गांधींनी नरेंद्र मोदींना विचारले.
त्याचसोबत मोदी-शहा म्हणतात हे अच्छे दिन आहेत. मात्र आजचे वातावरण असं झाले आहे की जेव्हा मनात येईल तेव्हा विधेयक आणा, कोणतंही विधेयक काढून टाका, राज्याचा नकाशा बदलून टाका, पाहिजे तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करा असा प्रकार देशात सुरु आहे असा आरोप त्यांनी केला.