नवी दिल्ली : देशात एक महिला सरन्यायाधीश हाेण्याची वेळ आली आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण सरन्यायाधीश शरद बाेबडे यांनी नाेंदविले आहे. महिलांचे प्रतिनिधित्व वाढले पाहिजे, या मागणीसाठी सर्वाेच्च न्यायालय महिला वकिलांच्या संघटनेने याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी करताना न्या. बाेबडे यांनी हे वक्तव्य केले.
न्यायपालिकेत पुरुषांच्या तुलनेत महिला न्यायाधीशांची संख्या कमी आहे. देशातील एकूण न्यायपालिकेत ही स्थिती दिसून येत आहे. याविराेधात महिला वकील संघटनेने याचिका दाखल केली. सर्वाेच्च न्यायालयातही महिला न्यायाधीशाची नियुक्ती व्हायला हवी. त्यासाठी पात्र महिला वकिलांचाही विचार झाला पाहिजे, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली. उच्च न्यायालयातही अधिक महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी सांगितले, घरगुती कारणे किंवा मुलांचे शिक्षण व इतर जबाबदाऱ्यांचे कारण सांगून अनेक महिलांनी न्यायाधीशपदी नियुक्त्या नाकारल्याचे विविध उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी यापूर्वी सांगितले आहे. सरन्यायाधीशांच्या निरीक्षणाला न्या. किशन काैल यांनीही समर्थन दिले.
जबाबदारी घेण्यास आनंद हाेईल- सरन्यायाधीशांच्या निरीक्षणावर काही महिला वकिलांकडून आक्षेपही घेण्यात आला आहे. - अनेक पुरुष वकील प्रॅक्टीस चांगली सुरू असल्यामुळे न्यायाधीशपदी नियुक्ती नाकारतात. त्यामुळे पुरुष न्यायाधीशांची संख्या कमी झाली का, असा सवाल मुंबईतील ॲड. वीणा गाैडा यांनी केला आहे. तर आम्ही तयार असून आणि ही जबाबदारी घेण्यास आनंद हाेईल, असे दिल्ली उच्च न्यायालय महिला वकील संघटनेने ट्वीट करून सरन्यायाधीशांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सर्वाेच्च न्यायालयात एकच महिला न्यायाधीश- सध्या भारतात २५ उच्च न्यायालयांमध्ये ८१ महिला न्यायाधीश आणि १,०७८ पुरुष न्यायाधीश आहेत.- तर सर्वाेच्च न्यायालयात केवळ एकच महिला न्यायाधीश असून २८ पुरुष न्यायाधीश आहेत.