नवी दिल्ली - दिवाळीपूर्वीच पेट्रोल दरवाढीचा भडका झाल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर एलपीजी गॅसच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एलपीजी गॅस सिलेंडर तब्बल 266 रुपयांनी महागला आहे. वाढत्या इंधन दरवाढीवरुन विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच, बॉलिवूडचा अभिनेता केआरकेनेही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
इंधन दरवाढीवरुन समाजवादी पक्षाचे नेते आयपी सिंह म्हणाले की, घरगुती गॅस सिलेंडरची किंमत लखनौमध्ये 937.50 एवढी झाली आहे. श्रीमंत असो किंवा गरीब आता कुणालाही सबसिडी मिळत नाही. पंतप्रधानांनी ओरडू ओरडून ग्रामीण भागात गॅस दिल्याचं सांगितलं. मात्र, आज ग्रामीण भागातील 99 टक्के जनता पारंपरिक स्त्रोतचा वापर करत आहे. त्यामध्ये, शेणाच्या गौऱ्या आणि वाळलेल्या लाकडांचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं.
काँग्रेस नेते श्रीनिवास बीवी यांनीही देशातील वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेल गॅस दरवाढीविरोधात मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसला जवळपास 70 वर्षे लागली होती, पेट्रोलचे दर 70 रुपयांवर नेण्यासाठी. पण, राष्ट्रवादी आणि संघी लोकांनी 7 वर्षातच 120 रुपयांवर नेऊन ठेवले आहेत. मग हा कसला राष्ट्रवाद? असा सवालही श्रीनिवास यांनी विचारला आहे. तसेच, विदेशी राष्ट्राध्यक्षांच्या जबरदस्तीने गळ्यात पडणाऱ्या पंतप्रधानांनी देशातील गरिबांना सर्वात शेवटी कधी गळाभेट दिली होती, कधी त्यांचं दु:ख ऐकून घेतलं होतं? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, मोदींनी दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅसच्या दरात 266 रुपयांनी वाढ केली. त्याबद्दल मी त्यांना सॅल्यूट करतो. मोदी हे हिंदू-मुस्लीम यांच्यात भेदभाव करत नाहीत, याचा हाच पुराव आहे, अशी खोचक टीका केआरकेनं केली आहे. तर, दिग्दर्शक अविनाश दास यांनी लिहिलं आहे की, ही तर शुभ दिवाळं निघालंय, असे ट्विट केलंय.