अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातील मतदान आज सुरु आहे. दरम्यान मतदान करण्यासाठी आलेला पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने भाजपाचा पराभव होणार हे अटळ असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी हार्दिक पटलेने गुजरातमधील जनतेला आवाहन करत आपली ताकद दाखवून द्यायला सांगितलं आहे. 'अहंकारात मिरवणा-यांच्या विरोधात मतदान करा. आपली ताकद काय आहे हे जनतेने दाखवून द्यावे', असं हार्दिक पटेल म्हणाला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीतील दुस-या टप्प्यातील 93 जागांसाठी मतदान सुरु झाले आहे. एकूण 851 उमेदवार रिंगणात असून दुस-या टप्प्यात मध्य आणि उत्तर गुजरातमध्ये मतदान होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची असल्याने भाजपा आणि काँग्रेसने पूर्ण ताकदीने प्रचार केला आहे.
9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधल्या 89 जागांसाठी मतदान झाले होते. पहिल्या टप्प्यात 66 टक्ते मतदान झाले होते. 2012 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात चार ते पाच टक्के मतदान कमी झाले. त्यामुळे दुस-या टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असेल. दुस-या टप्प्यात शहरी मतदारसंघ जास्त असून शहरी भागात भाजपाचे ब-यापैकी वर्चस्व आहे. अहमदाबादच्या लढतीकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. 18 डिसेंबरला गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.
मध्य गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 38 जागा आहेत. मध्य गुजरातमध्ये आनंद, खेडा, वडोदरा, पंचमहाल, दाहोद हे जिल्हे आहेत. 2012 मध्ये भाजपाने मध्य गुजरातमध्ये 38 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. उत्तर गुजरातमध्ये 53 जागा आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने इथे 32 आणि काँग्रेसने 21 जागा जिंकल्या होत्या. दुस-या टप्प्याच्या मतदानासाठी 25,558 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल, युवा नेते अल्पेश ठाकोर, जिग्नेश मेवानी या लढतींकडे सगळयांचेच लक्ष लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आपापल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावतील. गुजरातच्या उज्वल भवितव्यांसाठी अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोठया संख्येने मतदान करुन लोकशाहीच्या उत्सवाला समृद्ध करा असे म्हटले आहे.
जागांसाठी मतदान - 93एकूण मतदार - 22296867पुरुष मतदार - 11547435महिला मतदार - 10748977उमेदवार - 851पुरूष- 782महिला- 69