अमरावती (आंध्र प्रदेश), दि. 16 - आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या दोन वर्षांच्या मुलाला तब्बल 12 तासांनंतर सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. सध्या मुलावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून संध्याकाळपर्यंत त्याला घरी सोडण्यात येईल, अशी माहिती समोर आली आहे. 2 वर्षांचा चंद्रशेखर मंगळवारी रात्री उशीरा बोअरवेलमध्ये पडला. एनडीआरएफच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 फूट खोल बोअरवेलमध्ये 2 वर्षांचा चंद्रशेखर 15 फुटांपर्यंत अडकला होता. त्याला वाचवणं आव्हानात्मक होते. खोल बोअरवेलमध्ये पडलेला चंद्रशेखर बचावकार्यादरम्यान घाबरुन जाऊ नये, यासाठी दोरखंडासोबत एक मोबाइलदेखील त्यात सोडण्यात आला होता, जेणेकरुन तो आपल्या आईवडिलांचा आवाज ऐकू शकेल.
उपायुक्त मधुसुदन रेड्डी यांच्या नेतृत्त्वात एनडीआरएफच्या पथकानं चंद्रशेखरच्या बचावाची मोहीम तब्बल 10 तासांनंतर यशस्वी केली आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन.चिनाराजप्पा यांनी एनडीआरएफ, पोलीस आणि अन्य दलांनी चंद्रशेखरच्या बचावाची मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. शिवाय, अशा प्रकारे उघड्या अवस्थेत असलेली राज्यातील सर्व बोअरवेल बंद करण्यासाठी पाऊलं उचलण्यात येतील,असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
आणखी बातम्या(तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी)(राज्यात 3 दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज)(26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर)