मुंबई - मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होऊन 43 मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनमध्ये शपथविधी झाला. त्यामध्ये 15 जणांनी कॅबिनेट तर 28 जणांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले असून रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना डच्चू देण्यात आला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी 12 जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यावरुन, काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.
मोदी सरकारमधील प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांनाही मंत्रिमंडळातून काढण्यात आलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "बिचारे डॉ. हर्षवर्धन... 'बळीचा बकरा' ठरले" अशा शब्दांत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हल्लाबोल केला आहे. त्यानंतर, बिहारमधील काँग्रेस नेते किर्ती आझाद यांनीही मंत्रीमंडळ विस्तारावर बोचरी टीका केली आहे. 'खराब तर इंजिने होते, पण डब्बे बदलण्यात आले,' असे म्हणत किर्ती आझाद यांनी मोदींना लक्ष्य केलं आहे.
बिहारचे नेते असलेल्या आझाद यांची २०१५ मध्ये भाजपातून हाकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे भाजपात असताना त्यांनी मंत्रीपदही सांभाळले होते. आझाद यांनी २०१४ मध्ये चार वेळा खासदार असलेले मोहम्मद अली अश्रफ फादमी यांचा ३४,००० मतांनी पराभव केला होता. तर, दे भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.
नारायण राणेंना कॅबिनेटचा दर्जा
ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना कॅबिनेट तर कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे चारही जण वेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. मोदींचे मंत्रिमंडळ आता 78 जणांचे झाले असून त्यात 38 नव्या चेहेऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.