ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ३० - राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) बुधवारी हैदराबादमध्ये छापा मारुन इसिसचे मॉडयूल उधळून लावल्यानंतर आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एनआयएने ज्या ११ युवकांना ताब्यात घेतले आहे त्यांनी शहरात घातपाती कारवायांचा कट रचला होता.
गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची त्यांची योजना होती तसेच शहरातील प्रसिद्ध चारमिनार खाली असलेल्या भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस ठेवून शहरात दंगल भडकवण्याचा त्यांचा कट होता.
रमझानच्या पवित्र महिन्यात शहरात दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश होता. ज्या युवकांना अटक केली आहे ते नोकरी करतात. ते इसिसने भारतासाठी नियुक्त केलेला मोहरक्या शफी अरमारच्या संपर्कात होते. शफीवर भारतात इसिसचे जाळे तयार करण्याची जबाबदारी दिली आहे. मागच्या चार-पाच महिन्यांपासून एनआयएचे या युवकांच्या कारवायांवर लक्ष होते.
२५ जूनच्या संध्याकाळी या युवकांच्या फोनवरुन झालेल्या संभाषणानंतर एनआयएने धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला. फोनवरुन बोलताना त्यांनी समोरच्या व्यक्तीला गोमासाचे काही तुकडे आणण्यास सांगितल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले. दुबईवरुन त्यांना पैसा मिळणार होता.