नवी दिल्ली, दि. 11 - सीमेपलिकडील देशातील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी आणि पाकिस्तानाकडून वारंवार होणा-या दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर देण्यासाठी 2016 मध्ये 28 सप्टेंबर व 29 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. उरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शत्रूच्या घरात घुसून त्यांना सर्व बाजूंनी उद्ध्वस्त केल्याची कहाणी जेवढी रोमांचक आहे तेवढीच अंगावर शहारे आणणारीदेखील आहे. सर्जिकल स्ट्राईकचं नेतृत्व करणारे मेजर माइक टँगो यांनी या कारवाईचा थरारक अनुभव एका पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला आहे. मेजर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेला हल्ला योजना आखल्यानुसार अत्यंत योग्य पद्धतीनं व गतीनं करण्यात आला. मात्र आपलं लक्ष्य गाठल्यानंतर पुन्हा माघारी परतणं सर्वात कठीण होते. कारण शत्रू देशातील सैनिकांकडून झाडण्यात येणा-या गोळ्या अक्षरशः कानाजवळून जात होत्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईला आता एक वर्ष पूर्ण होईल. यानिमित्तानं प्रकाशित पुस्तकातून मेजर माइक टँगो यांनी महत्त्वपूर्ण अशा कारवाईसंदर्भातील थरारक अनुभव सर्वांसमोर मांडले आहेत. 'इंडियाज मोस्ट फीयरलेस: ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिटरी हीरोज' असे या पुस्तकाचे नाव आहे. भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक कारवाईत 38 दहशतवादी तर पाकिस्तानचे 2 सैनिक ठार झाले होते.
उरीच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त युनिटमधून सैनिकांची निवडमेजर माइक टँगो यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईकसाठी उरी दहशतवादी हल्ल्यामुळे नुकसान सहन करणा-या दोन युनिटमधून सैनिकांची निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. लष्कराने घटक तुकडची स्थापना केली आणि यामध्ये उरी हल्ल्यादरम्यान ज्या युनिटमधील सैनिक शहीद झाले होते त्याच युनिटमधील सैनिकांची निवड करण्यात आली. पुस्तकात असे लिहिण्यात आले आहे की, रणनीतीच्या स्वरुपात अत्यंत चतुराईने हे पाऊल उचलण्यात आले होते. संबंधित युनिटमधील सैनिकांची निवड करण्यामागे उरी हल्ल्यातील दोषींचा खात्मा करणं हा उद्देश होता. यासाठी मेजर टँगो यांनी मिशनचं नेतृत्व करण्यास निवडण्यात आले होते.
मेजर टँगोंनी निवडली टीम पुस्तकात नमूद करण्यात आल्यानुसार, टीम लीडरच्या स्वरुपात मेजर टँगो यांनी स्वतः सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांची निवड केली. मेजर यांना चांगलं माहिती होते की, निवड करण्यात आलेल्या 19 जणांचं आयुष्य त्यांच्या हातात होते. मात्र तरीही अधिकारी व कर्मचा-यांच्या पुन्हा सुखरुप पोहोचण्याबाबत मेजर टँगो थोडे चिंतेत होते. पुस्तकात त्यांनी या अनुभवाची आठवण करत म्हटले आहे की, जवानांना गमावण्याची मला भीती वाटत होती.
दहशतवाद्यांची 4 तळं केली उद्ध्वस्त मेजर यांनी सांगितले की, हल्ल्यानंतर एलओसीवर चढाई करणारा मार्ग पार करुन पुन्हा परतणं खूप कठीण होतं. ज्याठिकाणी सैनिकांची पाठ होती तिथून पाकिस्तानी सैनिक गोळीबार करत होते. दरम्यान, सर्जिकल स्ट्राईक कारवाईसाठी ISIद्वारे चालवल्या जा णा-या व पाकिस्तानी लष्कराकडून संरक्षण पुरवल्या जाणा-या दहशतवाद्यांच्या 4 तळांना टार्गेट करण्यात आलं. या कारवाईत 38 दहशतवादी तर पाकिस्तानचे 2 सैनिक ठार झाले होते.
'सर्जिकल स्ट्राईक' म्हणजे नेमके काय?शत्रू देशाच्या हद्दीत घुसून आपल्या विरोधात सुरू असलेल्या कारवाया नष्ट करणे म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईकचा अत्यंत कमी वेळासाठी वापर केला जातो. अशा प्रकारची कारवाई करायची असेल तर हवाई दलाची परवानगी घ्यावी लागते. 'सर्जिकल स्ट्राईक' ही विशिष्ट भागावरच केली जाते. हल्ल्याचे नियोजन करताना सर्व बाबींचा विचार केला जात असून ही कारवाई रात्रीच्या वेळीच केली जाते. प्रत्येक कारवाई नियोजनाप्रमाणे केली जाते. भारतीय लष्कराने म्यानमारमाध्ये घुसून अशा प्रकारची कारवाई केली होती. भारताच्या पॅरा कमांडोने एका तासात 40 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले होते. अमेरिकेने 2003 मध्ये 'सर्जिकल स्ट्राईक' करून इराक युद्धादरम्यान बगदादमध्ये बॉम्बद्वारे हल्ले केले होते.