ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 - भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मागच्या तीनवर्षात देशाला चांगले प्रशासन दिल्याचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. मोदी सरकारच्या तिस-या वर्षपूर्तीच्या निमित्ताने शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या दहावर्षाच्या कारभारावर जोरदार टीका केली.
धोरण लकव्याने ग्रस्त असलेले सरकार जाऊन 2014 मध्ये आमचे सरकार आले. आम्ही देशाला निर्णायक आणि पारदर्शक कारभार करणारे सरकार दिले. विद्यमान सरकार आणि 10 वर्षाच्या युपीएच्या कारभाराची तुलना करताना शहा म्हणाले की, यूपीएच सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले. पण सध्या विरोधकांना मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप करता आलेला नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार अनेक आघाडयांवर यशस्वी ठरल्याचा त्यांनी दावा केला. वन रँक, वन पेन्शन, जीएसटी, ओबीसी आयोग तसेच अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या प्रगतीचा त्यांनी दाखला दिला. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षाच्या काळात काही गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्या तीनवर्षात साध्य केल्या असे शहा म्हणाले.
तसेच कर्नाटकमध्ये होणा-या आगामी विधानसभा निवडणुकीत बीएस येडियुरप्पा भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. दक्षिणेत कर्नाटकमध्ये भाजपा पहिल्यांदा सत्तेवर आली. त्यावेळी येडियुरप्पा मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले होते.
सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. पुढच्यावर्षी मे 2018 मध्ये कर्नाटक विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. के.सिद्घरमय्या सध्या कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत. पीटीआयशी बोलताना अमित शहा यांनी कर्नाटकसाठी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री विजय रुपानीच गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे संकेत अमित शहा यांनी दिले. 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत 150 पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा शहा यांनी केला.