नवी दिल्ली - काही दिवसांपूर्वी भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांच्या मुलाने जीर्ण झालेल्या इमारतींवर कारवाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्याला बॅटने मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर मुलगा आकाश विजयवर्गीय आणि वडील कैलास विजयवर्गीय यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली. पालिका अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पालिकेचे कर्मचारी संपावर जाणार आहे. मात्र या घटनेत आरोपी आकाशच्या समर्थनार्थ कैलास विजयवर्गीय पुढे आलेत.
कैलास विजयवर्गीय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, जी मारहाणीची घटना घडली ती अचानक घडली. हे प्रकरण दोन्ही बाजूने चुकीच्या पद्धतीने हाताळले गेले. आकाश आणि पालिका अधिकारी दोघंही कच्चे खेळाडू आहेत. ही मोठी घटना नव्हती मात्र तिला मोठी करुन दाखविण्यात आली.
कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीशी सौजन्याने वागायला हवं. मात्र या प्रकरणात असं काही घडलं नाही. अशा घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दोघांनीही समजुतीने घ्यायला हवं होतं असंही कैलास विजयवर्गीय म्हणाले.
दरम्यान मीही एकेकाळी नगरसेवक, महापौर आणि मंत्री होतो. पावसाळ्यामध्ये कोणत्याही इमारतींवर कारवाई केली जात नव्हती. जर असं असताना पाडकाम करण्याचे आदेश कोणी दिले त्यांची ही चुकी आहे. जर तुम्हाला इमारत पाडायची होती तर रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था अगोदर करायला हवी होती. प्रशासनाकडून अशी कोणतीच उपाययोजना केली नाही. महिला पोलीस आणि महिला कर्मचारीही त्याठिकाणी असणं गरजेचे होते. अशा घटना पुन्हा होणार नाही हे मला वाटतं असं भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी सांगितले.
इंदूर परिसरात अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे, या परिसरातील जुन्या जीर्ण झालेल्या घराला पाडण्यासाठी आलेल्या पालिकेच्या अधिकाऱ्यांना आकाश विजयवर्गीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण केली. यादरम्यान स्वतः आकाश हे अधिकाऱ्याला बॅटने मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे. आकाश इंदूर- ३ मतदारसंघातून आमदार आहेत. या प्रकरणात पालिका अधिकारी गंभीर जखमी झाले होते. तर आकाश यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोपाळ कोर्टाने आकाश यांना या प्रकरणात जामीन दिला आहे.