विरोधी आघाडी INDIAच्या पंतप्रधानपदासाठीच्या चेहऱ्याची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकींपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला न केल्यास काहीही फरक पडणार नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
१९७७च्या सार्वत्रिक निवडणुकांचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, त्यावेळीही निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदासाठी मोरारजी देसाई यांच्या नावाचा उल्लेख नव्हता, तर त्यावेळी निवडणुका नव्याने स्थापन झालेल्या पक्षाच्या (जनता पार्टी) नेतृत्वाखाली लढल्या गेल्या होत्या आणि सरकार स्थापन झाले.
१९७७च्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता आणि निवडणुकीनंतर मोराराजी देसाई यांची पंतप्रधानपदासाठी निवड करण्यात आली. निवडणुकीपूर्वी देसाई यांचे नाव कुठेच नव्हते, अशी आठवण शरद पवारांनी करुन दिली. त्यामुळे २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकींपूर्वी देखील पंतप्रधानपदासाठीचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. लोक सत्ता परिवर्तनाच्या मूडमध्ये असतील तरच बदल घडवून आणण्याचा निर्णय घेतील, असं शरद पवारांनी सांगितले.
दरम्यान, INDIA आघाडीत बरेच स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील पक्ष आहेत त्यामुळे पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण होणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबाबत बोलताना जेडीयू कडून अनेकवेळा आपले नेते नितीश कुमार यांचे नाव घेण्यात आले आहे. तशातच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव यात घेतले जात आहे. या दरम्यान, खर्गेंना कोणी ओळखत नाही, नितीश कुमारच पंतप्रधानपदाचे उमेदवार असे विधान जेडीयूचे आमदार गोपाल मंडल यांनी केले आहे.