सुरत - ''मोदीजींप्रमाणे लेक्चर देण्यासाठी मला वर्ष लागतील'', अशी टीका करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषण शैलीवर निशाणा साधला आहे. सूरतमधील उद्योग जगतातील प्रतिनिधींच्या एका बैठकीला त्यांनी संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहीत भाजपाला टार्गेट केले. ''काँग्रेस आणि भाजपामध्ये केवळ एकच फरक आहे. त्यांना लेक्चर द्यायचे आहे, त्यांना तुम्हाला ऐकून घेण्याची इच्छा नाही. त्यांना लाऊडस्पीकरप्रमाणे तयार करण्यात आले आहे'', असे टीकास्त्र यावेळी राहुल गांधींनी सोडले आहे. द
दरम्यान यावेळी राहुल गांधी यांनी काँग्रेसबाबत सांगताना असे म्हटले की, ''लोकांच्या समस्या ऐकण्यात आणि त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न करायचा आहे''. नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेससहीत अन्य विरोधकांकडून 8 नोव्हेंबर हा दिवस 'काळा दिवस' म्हणून पाळण्यात आला. या आंदोलनात राहुल गांधी यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी राहुल गांधी यांनी असे म्हटले की, ''विचार करण्याची पद्धत बदलली आहे, कारण आधी त्यांना व्यवस्थेतील कमकुवत लोकांची मदत करायची इच्छा होती, मात्र आता व्यवस्थाच मजबूत करण्यावर प्रयत्न असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कारण सर्व कामं गतीनं व्हावीत''.
''तुम्ही तुमच्या समस्या लेखी स्वरुपात सांगा. मी वचन तर नाही देऊ शकत, मात्र त्या पाहेन आणि जर आमचे सरकार सत्तेत आले तर त्यांचे समाधान करण्यात येईल'', असेही यावेळी राहुल गांधी म्हणालेत. ''मी व काँग्रेस पक्ष उद्योगांची समस्या ऐकून घेऊ'', असं आश्वासनही यावेळी राहुल गांधी यांनी दिले. याबाबत सांगताना ते पुढे असंही म्हणाले की, 'आम्ही तुमच्या समस्या समजून घेऊ. सोडवण्याबाबत विचार करू आणि त्यावर कामदेखील करू'.
नोटाबंदी ही शोकांतिका : राहुल गांधीयाउलट काळा दिवस पाळणा-या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीमुळे देशाचे आर्थिक सामर्थ्य कमी झाले, बेरोजगारी वाढली, उद्योग बंद पडले, त्यातून जातीय विद्वेषाचे वातावरण वाढत गेले, अशी टीका केली. नोटाबंदी ही शोकांतिका होती, मोदींच्या अविचारी कृत्यामुळे लाखो लोकांचा रोजगार नष्ट झाला, असा आरोपही त्यांनी केला.
नोटाबंदीवरून देशभर रणकंदन!
दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांना काळा दिवस पाळत, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आदी शहरांत मोर्चे, धरणे, निदर्शने, मेळावे आदींचे आयोजन केले आणि आपला विरोध व्यक्त केला. महाराष्ट्रात काँग्रेसने नोटाबंदीचे वर्षश्राद्ध केले आणि अनेक कार्यकर्त्यांनी मुंडनही केले. भाजपाचे मंत्री व मुख्यमंत्री यांनी सर्व शहरांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन यूपीए सरकारच्या काळातील घोटाळ्यांच्या निमित्ताने काँग्रेसवर हल्ला चढवला. भाजपाने काळा पैसाविरोधी दिन साजरा करण्याचे जाहीर केले होते, पण पत्रकार परिषदा वगळता कोणतेही कार्यक्रम घेतले नाहीत. मुंबईत नितीन गडकरी तर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये नोटाबंदीचे समर्थन केले. मंत्र्यांनी काय बोलावे, याचा मसुदाच पंतप्रधान कार्यालयातर्फे तयार करण्यात आला होता की काय, असे मंत्र्याच्या विधानांमुळे जाणवत होते.
वर्षपूर्तीला संदेश नाहीनोटाबंदीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज टीव्ही व रेडिओवरून जनतेला संदेश देतील, ही अपेक्षा होती, पण तसे घडले नाही. पंतप्रधान कार्यालयाने सकाळी नोटाबंदीसंबंधी एक शॉर्ट फिल्म जारी केली. कर्जावरील व्याजदर घटला, स्थानिक संस्थांचा महसूल वाढला, घरांच्या, तसेच मालमत्तांच्या किमती कमी झाल्या, असा दावा पीएमओने केला. तसेच मोदी यांनी अॅपद्वारे नोटाबंदीवर जनतेला आपले मत मागितले आहे.