ITAT Congress: काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने काँग्रेस आणि युवक काँग्रेसशी संबंधित चार बँक खाती गोठवली होती. यासोबतच 210 कोटी रुपयांची वसुलीदेखील मागितली. याविरोधात काँग्रेसने आयकर अपीलीय न्यायाधिकरणाकडे (ITAT) दाद मागितली. पण, आता प्राधिकरणाने काँग्रेसला मोठा झटका दिला आहे. पक्षाने दाखल केलेली याचिका आयटीएटीकडून फेटाळण्यात आली आहे. काँग्रेसने या याचिकेत आयकर विभागाची वसुली आणि पक्षाची बँक खाती गोठवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
काय होती काँग्रेसची मागणी?काँग्रेसतर्फे ज्येष्ठ वकील विवेक तनखा यांनी बाजू मांडली. काँग्रेसला उच्च न्यायालयात जाण्यासाठी आदेशाला 10 दिवसांची स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली होती. मात्र, आमच्यासमोर तशी तरतूद नसल्याचे सांगत खंडपीठाने याचिका फेटाळली.
या आदेशावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केलाकाँग्रेस नेते अजय माकन यांनी आयटी न्यायाधिकरणाने काँग्रेसचे निधी गोठवण्याचा आदेश लोकशाहीवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. आयटी ट्रिब्युनलने लोकसभा निवडणुकीपूर्वी असा आदेश का दिला, असा सवाल त्यांनी केला.
काय आहे प्रकरण ?हे संपूर्ण प्रकरण 2018-2019 च्या आयकर रिटर्नशी संबंधित आहे. आयकर विभागाने काँग्रेसकडून दंड म्हणून 210 कोटी रुपयांची वसुली मागितली आहे. याशिवाय 2018-19 हे निवडणुकीचे वर्ष होते. काँग्रेसने 199 कोटी रुपये खर्च केले, त्यापैकी 14 लाख 40 हजार रुपये काँग्रेस खासदार आणि आमदारांनी त्यांच्या पगाराच्या रूपात जमा केले होते. हे पैसे रोख स्वरूपात जमा करण्यात आले. या कारणास्तव आयकर विभागाने काँग्रेसवर 210 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.