नवी दिल्ली - भारताच्या 69 व्या प्रजासत्ताक दिनाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुमच्या मोबाइलवर दिवसभरात आले असतील. पण आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरक्ष: काटा उभा राहिल. तुमची छाती अभिमानाने फुलेल आणि तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल. हिमालयात 18 हजार फूट उंचीवर सर्व बाजूंनी बर्फाने वेढले असताना, उणे 30 तापमानातही भारतीय जवानांनी आपलं देशप्रेम दाखवून दिलं आहे. इंडो-तिबेटिनयन सीमारेषा (आयटीबीपी) जवानांनी शुक्रवारी 26 जानेवारीला हाडं गोठवणा-या थंडीतही प्रजासत्ताक दिन साजरा करत तिरंगा फडकावला. आयटीबीपीने आपल्या शूर जवानांचा हातात तिरंगा घेतलेला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
फक्त 25 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इतक्या थंडीतही आपले जवान कसे काय सीमेची रक्षा करत असतील असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. व्हिडीओत चारही बाजूला फक्त आणि फक्त बर्फ दिसतो आहे. भारतीय जवान शिस्तबद्धपणे एका हातात बंदूक आणि तिरंगा घेऊन शांतपणे पुढे चालत जात आहेत. हे दृश्य पाहून आपल्या देशाचा आणि वीर जवानांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.