नवी दिल्ली : दिल्लीतील सर्वांत मोठ्या कोरोना केअर सेंटरची जबाबदारी आता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांकडे देण्यात आली आहे. दिल्लीतील छतरपूर येथील राधास्वामी बिआसच्या जागेत तब्बल १0 हजार बेड असलेले हे केंद्र असेल. या केंद्रातील रुग्णांची काळजी आयटीबीपीचे पोलीस घेतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. तिथे डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे कामही आयटीबीपीकडे सोपविण्यात आले आहे. या केंद्राचे काम जोरात सुरू असून, २६ जून रोजी तिथे दोन हजार बेडची व्यवस्था पूर्ण झालेली असेल.आयटीबीपी व अन्य केंद्रीय सुरक्षा दलाचे तब्बल एक हजार डॉक्टर्स, दोन हजार वैद्यकीय कर्मचारी व सुरक्षा कर्मचारी तिथे उपलब्ध असतील. राजधानी दिल्लीतील कोरोना रुग्णांची काळजी व त्यांच्यावर उपचार करणारे हे सर्वात मोठे केंद्र असेल. त्यांना प्रशासकीय मदत दक्षिण दिल्ली जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात येईल..........................सीमेची सुरक्षाही त्यांच्याकडेआयटीबीपीचे तब्बल ९0 हजार जवान रोज चीनला लागून असलेल्या भारतीय सीमेचे रक्षण करतात. ही सीमा ३ हजार ४८८ किलोमीटरची आहे. चीनशी अलीकडे जो संघर्ष झाला, त्या लडाख भागातही आयटीबीपीचे जवान तैनात आहेत.
दिल्लीच्या केअर सेंटरची जबाबदारी आयटीबीपीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 3:18 AM