नवी दिल्ली : १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत काँग्रेसला आयटीसी व तिच्या उपकंपन्यांकडून २० कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. काँग्रेस पक्षाला मोठी देणगी देणाऱ्या नामांकित कंपन्यांमध्ये आयटीसीचा समावेश झाला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात मिळालेल्या देणग्यांचा तपशील काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला सादर केला होता.भाजप, तृणमूल काँग्रेस, भाकप, माकप आदी पक्षांना गेल्या वर्षी मिळालेल्या देणग्यांचे अहवाल निवडणूक आयोगाने जनतेसाठी अद्याप खुले केलेले नाहीत. २०१९-२० या वित्तीय वर्षात बसपला २० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची एकही देणगी मिळालेली नाही व राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण ६० कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.काँग्रेस पक्षाला आयटीसीकडून सुमारे १३ कोटी रुपये देणगी मिळाली आहे. आयटीसीच्या उपकंपन्या असलेल्या आयटीसी इन्फोटेक, रसेल क्रेडिट लिमिटेड या कंपन्यांनी अनुक्रमे ४ कोटी व १.४ कोटी रुपयांची देणगी काँग्रेस पक्षाला दिली आहे.
देणग्या कोणी दिल्या?विविध कंपन्यांच्या निवडणूक ट्रस्टनी काँग्रेस पक्षाला मोठ्या देणग्या दिल्या आहेत. भारती एअरटेल ग्रुप, डीएलएफचे पाठबळ असलेल्या प्रुडंट इलेक्ट्रोरल ट्रस्ट व जनकल्याण इलेक्ट्रोरल ट्रस्टने काँग्रेस पक्षाला अनुक्रमे ३० कोटी व २५ कोटी रुपयांच्या देणग्या मागील वित्तीय वर्षात दिल्या आहेत.
देणग्यांची सविस्तर नोंदराजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या मिळालेल्या देणग्यांचीच नोंद त्यांच्या अहवालात केली जाते. अशा पद्धतीने काँग्रेसने गेल्या वर्षी मिळालेल्या १३९ कोटी रुपयांच्या देणग्यांची नोंद यासंदर्भातील अहवालात केली आहे.