नवी दिल्ली - दोन मतदार ओळखपत्रे सोबत बाळगल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेला माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीतील भाजपाचा उमेदवार गौतम गंभीर याने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. साडे चार वर्षांत दिल्लीमध्ये काही विशेष करता न आल्याने आपकडून नकारात्मक राजकारण करण्यात येत आहे. आता या आरोपाबाबत निवडणूक आयोगच काय तो अंतिम निर्णय घेईल, असे गंभीरने म्हटले आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे. दरम्यान, गौतम गंभीरजवळ राजेंद्र नगर आणि करोल बागमधील दोन मतदान कार्ड आहेत. त्यामुळे याप्रकरणी त्याला एक वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते, असा आरोप पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपच्या उमेदवार आतिशी यांनी गौतम गंभीर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाला की, ''जेव्हा तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचे व्हिजन नसते. तसेच तुम्ही साडे चार वर्षांत काहीही काम केलेले नसते तेव्हा तुम्ही असे नकारात्मक आरोप करू लागता.आता यावर निवडणूक आयोगच निर्णय घेईल. मात्र जेव्हा तुमच्याकडे व्हिजन असते तेव्हा तुम्हाला नकारात्मक राजकारण करावे लागत नाही,'' असा टोला गौतम गंभीरने लगावला.
हे तर आपचे नकारात्मक राजकारण, गौतम गंभीरचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 3:16 PM