पाटणा, दि. 27 - संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन बुधवारी मोठा राजकीय भूकंप केला आहे. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी बुधवारी संध्याकाळी आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान नितीश कुमार यांनी बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर टीकास्त्र सोडले. यावरुन लालू प्रसाद यादव यांनीही नितीश कुमारांवर हत्येचा आरोप करत पलटवार केला आहे.
लालू यांनी पत्रकार परिषद घेत पुरावा म्हणून काही कागदपत्रं सादर केली. यावेळी लालू म्हणाले की, नितीश कुमार यांना अडचणीत येण्याचा अंदाज आला, यासाठी त्यांनी भाजपासोबत आधीच सेटिंग केले. येथे नितीश यांनी राजीनामा दिला तेथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुकाचं ट्विट केले. हे सर्व काही सेटिंग असल्याचे सिद्ध होत आहे, असेही लालू म्हणाले.
लालू प्रसाद यादव पुढे असेही म्हणाले की, मी रात्रीदेखील नितीश यांच्यासोबत 40 मिनिटं संवाद साधला. मात्र त्यांनी कोणत्या प्रकारे राजीनाम्याची मागणी केली नव्हती. नितीश केवळ एवढंच म्हणाले की, आरोपांबाबत स्पष्टीकरण द्या, काहीही घाई नाही. यावर आम्ही म्हटले की आरोपांमध्ये त्रुटी आहेत, जेडीयू काही सीबीआय नाही. जे काही स्पष्टीकरण द्यायचे आहेत, ते सार्वजनिक करू, तपास यंत्रणांना सांगू.
पुढे ते असेही म्हणाले की, नितीश कुमार यांना माहिती होते की, राजीनामा घेण्यासाठी काहीही आधार नाही. यावेळी लालूंनी नितीश कुमारांवर खळबळजनक आरोप करत सांगितले की, नितीश कुमार यांच्यावर 302 कलमांतर्गत आरोप करण्यात आलेत. त्यांना ही बाब माहिती होती देशातील पहिला असा मुख्यमंत्री आहे ज्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि याची दखलही घेतली गेली आहे. या गुन्ह्यांतर्गत त्यांना आजीवन कारावास किंवा फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे. यावेळी लालू यांनी नितीश कुमार यांचं शपथपत्रदेखील सादर केले. हे प्रकरण पाटणा हायकोर्टात सुरू असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिवाय, आता आपण वाचणार नाही, ही बाब नितीश यांना माहीत झाली होती. म्हणून त्यांनी आपला राजीनामा देण्याची खेळी खेळली. नितीश हे आरएसएस व भाजपासोबत मिळालेले आहे.
लालूंनी पंतप्रधान मोदींवरही साधला निशाणानितीश कुमारांना टीकास्त्र सोडण्यासोबत यावेळी लालूंनी पंतप्रधान मोदी व भाजपालाही टार्गेट केले. नितीश यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्वरित ट्विट करत त्यांचे कौतुक केले. यावर लालू म्हणालेत की, काय सेटिंग आहे देशाच्या पंतप्रधानांची लगेच ट्विटदेखीस केले. भाजपाचे समर्थन घेणार का?, असे एका पत्रकारानं नितीश यांना विचारल्यानंतर त्यांनी नकार दर्शवला नाही. सर्व सेटिंग आहे. जाताना मी नितीश यांना म्हटलेदेखील, ''असे करू नका, जातीय शक्ती आपल्याला रोखू इच्छिते, त्यांच्याच मांडीवर जाऊन खेळू नका''.