'आपल्याकडे केवळ सैन्यात असले तरच मुस्लिमांना राष्ट्रभक्त समजतात'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 12:46 PM2018-02-14T12:46:17+5:302018-02-14T12:46:35+5:30
दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते.
नवी दिल्ली: आपल्याकडे सर्वांना मुस्लिम लोक सैन्यात असले तरच ते राष्ट्रभक्त असतात, अशा प्रतिकात्मक दृष्टीकोनातून पाहायची सवय झाली आहे, असे विधान काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केले. एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सुंजवां येथील दहशतवादी हल्ल्यात 5 काश्मीरी मुसलमानांचा मृत्यू झाल्याचे सांगत मुस्लिमांच्या देशप्रेमावर शंका घेणाऱ्यांना फटकारले होते. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेले ७ पैकी ५ जवान हे काश्मिरी मुसलमान होते. आता यावर कोणी काहीच बोलताना दिसत नाही. मुसलमानांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घेतला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते.
Muslims contribute towards nation just like anyone else. Outfits say Muslims are anti-nationals & don't love the nation. It's almost symbolic that if you are in the Army, you are a nationalist. I think that is why Owaisi Ji had to say that: Sandeep Dikshit, Congress pic.twitter.com/JqtWdtBLJy
— ANI (@ANI) February 14, 2018
ओवेसी यांच्या या वक्तव्याचे संदीप दीक्षित यांनी समर्थन केले. त्यांनी म्हटले की, भारतातील इतर कोणत्याही धर्माच्या नागरिकांप्रमाणेच मुस्लिमांनीही या देशासाठी योगदान दिले आहे. मात्र, काही संघटना मुस्लिमांना देशद्रोही म्हणून हिणवतात, त्यांचे भारतावर प्रेम नसल्याचा खोटा प्रचार करतात. आपल्याकडे केवळ मुस्लिम व्यक्ती सैन्यात असेल तरच तिला राष्ट्रभक्त समजले जाते. त्यामुळेच ओवेसी यांनी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या ७ पैकी ५ भारतीय जवान हे काश्मिरी मुसलमान असल्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला असावा, असे संदीप दीक्षित यांनी सांगितले.
तत्पूर्वी ओवेसी यांनी जम्मू-काश्मीरमधील भाजपा-पीडीपी सरकारवरही ताशेरे ओढले होते. भाजपा-पीडीपीवाले दोघे एकत्रित बसून मलई खात आहेत. कधीपर्यंत नाटकं करीत राहतील हे लोक. हे यांचे अपयश आहे. याची जबाबदारी कोणाची असेल, याचा विचार करायला हवा, असे ओवेसींनी म्हटले होते.