नवी दिल्ली - रेल्वे प्रवास आणि गर्दी हे समीकरण आता नित्याचेच झाले आहे. मुंबईची लोकल असो, सर्वसाधारण ट्रेन असो, एक्सप्रेस असो, सुपरफास्ट एक्सप्रेस असो रेल्वे प्रवाशात गर्दीचा सामना प्रवाशांना करावाच लागतो. त्यामुळे, जनरल तिकीट काढूनही प्रवासी स्लीपर कोचमधून प्रवास करतात. तर, लांब पल्ल्यांच्या अनेक ट्रेनमध्ये जनरल डब्ब्यात पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे, पुढील ठिकाण गाठण्यासाठी नियोजित वेळेत पोहोचण्यासाठी प्रवाशांना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते. मात्र, हीच कसरत करताना एका प्रवाशाने चक्क दिल्ली ते कानपूर असा तब्बल ४०० किमीचा प्रवास केला आहे.
युपीमधील एका रेल्वे प्रवाशाला ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे, या युवकाने चक्क रेल्वेच्या छतावर बसून दिल्लीहून कानपूर गाठले. या प्रवासादरम्यान त्याने तब्बल ४०० किमीचा प्रवास केला. कानपूरमध्ये ट्रेन पोहोचल्यानंतर संबंधित युवकाला ट्रेनच्या टपावर पाहून रेल्वे अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ हायटेन्शन वायरची लाईन बंद करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर, युवकाला ट्रेनवरुन खाली उतरवत त्याची चौकशी केली.
रेल्वेत बसायला जागा न मिळाल्याने आपण रेल्वेच्या डब्ब्यावर चढलो. मात्र, तिथे डोळे झाकून पडल्यानंतर थंड गार वाऱ्यामुळे झोप लागली. त्यामुळे, मी रेल्वेच्या डब्यावर बसूनच प्रवास केल्याचं युवक दिलीप याने रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र, दिलीपचा हा प्रवास धोकादायक आणि दंडनीय अपराध असल्याने त्यास रेल्वेच्या कोर्टात हजर करण्यात आले होते. न्यायाधीशांनी त्यास दंड भरण्याची शिक्षा ठोठावली. तसेच, पुन्हा असा अपराध केल्यास कडक शिक्षा सुनावण्यात येईल, अशी समजही दिली.
हमसफर एक्सप्रेसमधील घटना
दरम्यान, नवी दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनल्सवरुन गोरखपूर जंक्शन जाणाऱ्या हमसफर एक्सप्रेसच्या बी ११ कोचच्या छतावर दिलीप कुमार हा प्रवासी झोपला होता. छतावर पडल्यानंतर झोप लागल्याने तो कानपूर सेंट्रल स्टेशनपर्यंत पोहोचला. तब्बल १३० किमी वेगाने धावणाऱ्या रेल्वे प्रवासात दिलीप कुमार ४०० किमीपर्यंत ट्रेनच्या छतावर होता. कानपूर स्टेशनवर ट्रेन पोहोचल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्यानंतर दिलीप कुमार यास ट्रेनवरुन खाली उतरवण्यात आले.