"सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाही, परंतु..."; केंद्रीय टीमबाबत म्हणाल्या ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 09:31 AM2021-05-07T09:31:14+5:302021-05-07T09:32:49+5:30
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर काही ठिकाणी झाला होता हिंसाचार.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर टीम पाठवण्याच्या संदर्भात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. नुकतेच पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला २१३ जागांवर विजय मिळाला. यानंतर काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या. दरम्यान, यावरून भाजप आणि तृणमूल काँग्रेस आमने-सामने आले आहेत. "माझी शपथ घेऊन २४ तासही झाले नाहीत आणि मला पत्रही येऊ लागली आहेत. एक केंद्रीय टीम पोहोचली आहे. असं यासाठी आहे कारण या ठिकाणी जनतेनं भाजपला स्वीकार केलं नाही," असं ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.
"जनादेशाचा स्वीकार करण्याचं मी आवाहन करते. आपल्याला कोरोनाच्या स्थितीचा सामना करण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यांनी थेट केंद्राच्या कोरोना नीतीवरच प्रश्न उपस्थित केला आहे. "केंद्राकडे कोरोनासंदर्भात कुठल्याही प्रकारची पारदर्शक नीती नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. यात अधिक चांगले धोरण तयार करावे, अशी विनंती मी त्यांना केली आहे," असे ममता म्हणाल्या. याच बरोबर, भाजपच्या लोकांनी बंगालमध्ये येऊन कोरोना पसरवला, असा आरोप करत अद्याप राज्याला पुरेशा लशी मिळालेल्या नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (CM Mamta banerjee says corona Virus increased in bengal due to repeated visits of bjp leaders)
"ममता म्हणाल्या भाजप नेते राज्यात फिरत आहेत. येथील जनतेला भडकावत आहेत. नव्या सरकारला अद्याप २४ तासही झालेले नाहीत आणि ते पत्र पाठवत आहेत. टीम आणि नेते येत आहेत. ते खरोखरच जनादेश स्वीकारायला तयार नाहीत. मी त्यांना लोकांचा जनदेश स्वीकारण्याची विनंती करते," असंही त्या म्हणाल्या. "मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी अद्याप आपल्याला कसल्याही प्रकारचे उत्तर दिलेलं नाही. ते २० हजार कोटी रुपये खर्च करून नवी संसद आणि पुतळे तयार करत आहेत. मात्र, लसीसाठी ३० हजार कोटी रुपयांची व्यवस्था करू शकत नाहीत," असंही त्या म्हणाल्या.