Shashi Tharoor : गेल्यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रसने चांगले प्रदर्शन केले, पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या हाती मोठी निराशा आली. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर पक्षाला सलग तिसऱ्यांदा भोपळा मिळाला. यातच आता खासदार शशी थरुर यांनी काँग्रेसच्या भवितव्यावर महत्वाची टिप्पणी केली आहे.
शशी थरुर म्हणतात की, तुम्हाला देशात बदल घडवून आणायचा असेल, तर एकटे लढून चालणार नाही, तर इतर पक्षांना सोबत घ्यावे लागेल. यूपी आणि बिहारमध्ये आम्ही आघाडी करुनच पुढे जाऊ शकतो. दिल्लीत पक्ष तीन वेळा सत्तेबाहेर असल्याने दिल्लीत पुनरागमन कठीण आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख करत थरुर म्हणतात, काँग्रेस आज प्रत्येक राज्यात एक-दोन जागावर आहे, मात्र इतर पक्ष केवळ एक दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत.
अशी अनेक राज्ये आहेत, जिथे काँग्रेस आघाडी करुनच पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, काँग्रेस 1996 पर्यंत यूपीमध्ये स्वबळावर सत्तेत होती आणि सरकारही चालवले, पण आता त्याची शक्यता फारच कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करूनच आपण पुढे जाऊ शकतो. बिहारमध्येही तेच आहे. तमिळनाडूतही आमची द्रमुकसोबत आघाडी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्याची कहाणी वेगळी आहे.
कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जी ताकद दाखवू शकते, ती पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखवू शकणार नाही, पण आम्ही वेगळ्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. देशात बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची गरज नाही. एकाच विचारधारेच्या इतर पक्षांसोबत पुढे जाता येऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले. यावरुन आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करणार असल्याचे बोलले जात आहे.