श्रीनगर : श्रीनगरमध्ये शुक्रवारी काही युवकांनी पाकिस्तान आणि इसिसचे (इस्लामिक स्टेट्स आॅफ इराक अॅन्ड सिरिया) झेंडे दाखवत पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे तणाव निर्माण झाला. जम्मू-काश्मिरात अलीकडे इसिसचे आणि पाकिस्तानी झेंडे दाखविण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातून इसिस भारतात पाय रोवू पाहत असल्याचे भयसूचक संकेत मिळत असल्याने गुप्तचर तसेच सुरक्षा यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. त्यात इसिसने दोन दिवसांपूर्वी लिबियात चार भारतीय शिक्षकांचे अपहरण केल्याची भर पडली आहे.जामिया मशिदीत नमाज अदा केल्यानंतर युवकांच्या एका गटाने स्वातंत्र्याचे नारे देत नौहट्टा चौकाकडे मार्च नेला तेव्हा सुरक्षा जवानांनी त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अलीकडेच मरण पावलेला तालिबानी अतिरेकी मुल्ला ओमर आणि मुंबई बॉम्बस्फोटातील फासावर गेलेला आरोपी याकूब मेमन याच्यासाठी श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठ आणि अनंतनाग जिल्ह्यात मृत्यूनंतरची विशेष प्रार्थना करण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ३१ जुलै रोजी लागोपाठ तिसऱ्या शुक्रवारी श्रीनगरच्या जामिया मशिदीजवळ इसिसचे झेंडे दाखविण्यात आल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हे झेंडे फडकाविणाऱ्या १२ युवकांची ओळख पटवली आहे. अर्थात यापूर्वीही असेच कृत्य करणाऱ्या युवकांचा माग काढण्यात आला होता.पण त्यांची ओळख पटल्यावरही त्यांना अटक करण्यापेक्षा त्यांच्यावर करडी नजर ठेवणेच काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांनी पसंत केले होते. या वेळीही तसेच धोरण सुरक्षा यंत्रणांनी स्वीकारले आहे. ओलिसांच्या निर्घृण हत्येची छायाचित्रे जारी करीत मध्य- पूर्वेत दहशत निर्माण करणारी इसिस जम्मू-काश्मिरात अजून सक्रिय नसली तरी तिचे समर्थन करण्याच्या घडामोडींनी सुरक्षा दलाची चिंता वाढवली आहे. (वृत्तसंस्था)
श्रीनगरमध्ये पुन्हा इसिसचे झेंडे
By admin | Published: August 01, 2015 4:51 AM