ही एक ऐतिहासिक घोडचूक, तिहेरी तलाक विधेयकावर काँग्रेस नेते राज बब्बर यांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 07:29 PM2019-07-30T19:29:03+5:302019-07-30T19:29:37+5:30
तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले. मात्र काँग्रेसने या विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेत या विधेयकाला विरोध केला.
नवी दिल्ली - तिहेरी तलाक विधेयक अखेर राज्यसभेमध्ये मंजूर झाले. मात्र काँग्रेसने या विधेयकातील काही तरतुदींवर आक्षेप घेत या विधेयकाला विरोध केला. दरम्यान, तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर होणे ही एक ऐतिहासिक घोडचूक असल्याचे मत काँग्रेसचे नेते राज बब्बर यांनी व्यक्त केले आहे.
राज्यसभेमध्ये दिवसभर झालेल्या वादळी चर्चेनंतर मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयक संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पारित झाले. हे विधेयक पारित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते राज बब्बर म्हणाले की, ''हे विधेयक राज्यसभेमध्ये मंजूर होणे हा देशातील कुठल्याही कौटुंबिक कायद्याला बसलेला जबरदस्त धक्का आहे. या माध्यमातून दिवाणी कायद्याला फौजदारी कायदा बनवण्यात आले आहे. ही एक ऐतिहासिक घोडचूक आहे.''
Raj Babbar, Congress on #TripleTalaqBill passed in Rajya Sabha, today: Main samajhta hoon ki is desh ke andar kisi bhi family law ko lekar ek bahot bada jhatka hai. A civil law has been made a criminal law. It's a historic mistake. pic.twitter.com/81jEKpFfPV
— ANI (@ANI) July 30, 2019
केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यानंतर भाजपाने पुन्हा एकदा तिहेरी तलाक विधेयक मंजूर करवून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. दरम्यान, लोकसभेमध्ये भाजपाकडे स्पष्ट बहुमत असल्याने हे विधेयक लोकसभेत पुन्हा एकदा पारीत झाले होते. मात्र राज्यसभेत भाजपा आणि मित्रपक्षांकडे बहुमत नसल्याने या विधेयकाचे काय होणार याकडे सर्वांकडे लक्ष लागले होते. अखेर मित्रपक्षांचा सभात्याग आणि विरोधी पक्षांच्या विरोधानंतरही आवश्यक संख्याबळाची पूर्तता करण्यात यश आल्याने तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.
या विधेयकावर घेण्यात आलेल्या मतविभागणीत विधेयकाच्या बाजूने 99 आणि विरोधात 84 मते पडली. आता राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानंतर मुस्लिम महिला (विवाह अधिकार संरक्षण) विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल.