नवी दिल्ली: लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनावर भाष्य केलं होतं. बिपीन रावत यांनी जे लोकांना चुकीच्या मार्गाने घेऊन जातात, ते नेते नसतात, असं मत व्यक्त केले होते. बिपीन रावत यांच्या या विधानावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी टीका केली आहे.
पी. चिदंबरम म्हणाले की, बिपीन रावत सरकारला पाठिंबा देण्याची भाषा बोलत असून ही लाजिरवाणी गोष्ट आहे. मी बिपीन रावत यांना विनंती करतो की, तुम्ही लष्करप्रमुख असून आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे हे सांगत नाही. तसेच राजकीय नेत्यांनी काय करायला हवे हे सांगण्याचे लष्कराचे काम नसल्याचे पी. चिदंबरम यांनी तिरुवनंतपुरमच्या सभेत सांगितले.
दिल्लीत आयोजित केलेल्या एका ‘हेल्थ समीट’मध्ये बोलताना बिपीन रावत म्हणाले की, लोकांना चुकीच्या मार्गाला नेणे हे नेत्यांचे काम नाही. देशाच्या अनेक शहरांमध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी हिंसाचार व जाळपोळ करणाऱ्या जमावांचे कसे नेतृत्व करीत होते हे आपण पाहिले. त्यामुळे अशाप्रकारच्या नेतृत्वाला चांगले नेतृत्व म्हणत नाही असं मत बिपीन रावत यांनी व्यक्त केले होते.