नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या इवांका ट्रम्प भारत दौ-यावर आल्या आहेत. इवांका ट्रम्प मंगळवारी पहाटे जवळपास 5 वाजण्याच्या सुमारास हैदराबाद येथे दाखल झाल्या आहेत. तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इव्हांका ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ परिषदेसाठी भारतात दाखल झाले आहे.
36 वर्षीय इव्हांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागारही आहेत. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करणार आहेत. अमेरिकेच्या 38 राज्यांतील 350 प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत. भारत-अमेरिका यांच्यातर्फे होणा-या या परिषदेसाठी हैदराबादचे सुशोभीकरण केले आहे. शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे. पंतप्रधान मोदी आणि इव्हांका ट्रम्प यांच्यासह पाहुण्यांसाठी फलकनुमा राजवाड्यात निजामकालीन टेबलावर स्नेहभोजन होणार आहे
जगभरातील उद्योजक, नवोन्मेषी कल्पक उद्योजक, गुंतवणुकदार यांना एकत्र आणणारे व्यासपीठ म्हणजेच जागतिक उद्योजकता शिखर परिषद 2017 (जीईएस) हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे. यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या व सल्लागार इवान्का ट्रम्प अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत.
तरुण तसेच नवोन्मेषक अनुभवी उद्योजक यांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करत असते. विविध देशातील तरुण या परिषदेत जमतात, आपले अनुभव आणि कल्पना इतरांना सांगतात तसेच जमलेल्या इतर तरुणांच्या कल्पनांवरही चर्चा करतात. अशा प्रकारे एकाच वेळेस जगातील विविध देशांतील तरुणांच्या मनात कोणत्या उद्योजक कल्पना येत आहेत. त्याचं भान सहभागी तरुणांना येत. गुगल, फेसबूक, उबर सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे लोकही यात सहभागी होतात. मागच्या वर्षी सुंदर पिचाई, मार्क झकरबर्ग हे अमेरिकेत झालेल्या परिषदेत सहभागी झाले होते. उपस्थित तरुणांना त्यांनी आपला जीवनप्रवास आणि प्रारंभीच्या काळातील खटपट याबाबत माहिती दिली होती. अशा अनेक कल्पक उद्योजक, गुंतवणुकदारांना या परिषदेत ऐकण्याची संधी तरुणांना मिळते.
भारतातर्फे नीती आयोग भारत सरकारचे प्रतिनिधित्व या परिषदेत करणार आहे. नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी हैदराबाद येथे ही परिषद होण्यास संमती दिल्याबद्दल तेलंगणा सरकारचे आभार मानले होते.