New Delhi Railway Station Stampede: '१९८१ पासून रेल्वेमध्ये हमाल म्हणून काम करतोय, पण अशी गर्दी मी माझ्या आयुष्यात कधीच बघितली नाही. आम्ही स्वतः १५ मृतदेह रुग्णवाहिकांमध्ये ठेवले. नंतरचे माहिती नाही. घटना बघून मी जेवण सुद्धा केलं नाही', अशी आपबीती नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या हमालाने सांगितली. अचानक धावपळ का उडाली आणि चेंगराचेंगरी कशी झाली, याबद्दलही या हमालाने सांगितले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना घडली. अफवा पसरल्यामुळे गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. ऐनवेळी प्रयागराज एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म बदलल्याने गोंधळ उडाला आणि त्याचे पर्यावसान चेंगराचेंगरीत झाले.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका हमालाने चेंगराचेंगरीचा सगळा घटनाक्रम सांगितला.
प्रयागराज एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म बदलला
"मी १९८१ पासून रेल्वेत हमाल म्हणून काम करतोय. मी अशी गर्दी यापूर्वी कधीच माझ्या आयुष्यात पाहिली नाही. प्रयागराजसाठी विशेष एक्स्प्रेस पाठवण्यात येत होती. त्या एक्स्प्रेसचा प्लॅटफॉर्म क्रमांक १२ बदलून प्लॅटफॉर्म क्रमांक १६ करण्यात आला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवर १२ वरील लोक प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वर आले", अशी माहिती या हमालाने दिली.
"प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून लोक प्लॅटफॉर्म १६ वर जाऊ लागले. त्याचवेळी चालण्याचा जिना आणि सरकत्या जिनावर लोक पडायला लागले. आणि घटना घडली. आम्हाला (हमालांना) जेव्हा घटनेची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही लोकांना रोखलं. रस्ता बंद केला आणि मृतदेह बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेत नेले", असे हा हमाल म्हणाला.
प्रत्यक्षदर्शी असलेल्या हमालाने पुढे सांगितले की, "१५ मृतदेह आम्ही स्वतः ठेवले. त्यानंतर पुढे माहिती नाही. लोक खाली दबले होते. आमची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की मी जेवण सुद्धा केलं नाही, ती घटना बघून. तीन तास हमालांनी इतकी मदत केली की, तितकी पोलिसांनीही केली नाही."
पोलीस पाठवा म्हणून कॉल केला तर अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या
"आम्ही कॉल केला की गोंधळ झाला आहे, पोलीस पाठवा. पण, अग्निशामक दलाच्या तीन गाड्या आल्या. त्यांना वाटलं की, आग लागली आहे. त्यानंतर चार रुग्णवाहिका आल्या. एक-एक, दोन-दोन मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गेल्या. ही घटना आम्ही बघितली", असे या हमालाने सांगितले.
१८ जणांचा मृत्यू
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला आहे. यात महिला, लहान मुलांचाही समावेश आहे. प्रयागराजला जाण्यासाठी मोठी गर्दी स्थानकावर झाली होती. प्रयागराज एक्स्प्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वर येणार होती. मात्र, नंतर तिचा प्लॅटफॉर्म बदलून १६ करण्यात आला.